कोपरगाव (प्रतिनिधी) – धकाधकीच्या जीवनात तणावाखाली जीवन जगतांना आत्मशांती मिळावी, यासाठी स्वतःला वेळ देणे आवश्यक आहे, असे प्रतिपदान ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष परमानंद महाराज यांनी केले.
एक पाऊल डॉक्टरांच्या आरोग्याकडे या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर प्रीमिअर लीगच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कोपरगाव व शिर्डी येथील इंडियन डेंटल असोशिएशन व आत्मा मालिक क्रिकेट ऍकॅडेमीच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आत्मा मालिक ध्यानपीठाचे आत्म मालिक माऊली यांच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विवेकानंद महाराज व संत मांदियाळी, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश वाघ, माजी अध्यक्ष डॉ. गोविंद भोसले, कोषाध्यक्ष डॉ. नीलेश गायकवाड, सचिव डॉ. किरण खांदे, डॉ. अजय गर्जे, डॉ. किशोर नागरे, डॉ. ज्ञानेश्वर खंडीझोड, प्रा. सुधाकर मलिक, जनसंपर्क अधिकारी योगेश गायके, विभाग प्रमुख सुरेश शिंदे, दिनकर राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
परमानंद महाराज म्हणाले, डॉक्टरांनी केलेल्या या लीगचे आयोजन गौरवास्पद आहे. जीवनत्वाला कारण असणारा आत्मा आहे. स्वतःला वेळ देणे म्हणजे आत्म्याला वेळ देणे. त्याला वेळ दिला की जीवनात आनंद मिळतो. डॉ. खांदे म्हटले, डॉक्टरांचे व्यस्त दैनंदिन कार्यक्रमात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. डॉक्टरांनीही आपल्या क्लिनिक बाहेर पडून मैदानी खेळ खेळावे, ध्यान व योगासने करावे. डॉ. गणेश म्हणाले, असोसिएशनच्या स्थापनेपासून आत्मा मालिक माऊलींचे सान्निध्य डॉक्टारांना लाभावे, अशी इच्छा होती. स्पर्धेत सहा संघांनी सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन अजय देसाई यांनी केले, तर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी संदीप बोळीज व अमोल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.