- वाकड पोलिसांची कामगिरी
पिंपरी – खेळताना घरापासून दूर गेलेली दोन वर्षांची मुलगी रडताना वाकड पोलिसांना मिळून आली. मुलगी हरवल्याची तक्रार घेऊन कोणीच पोलीस ठाण्यात आले नाही. यामुळे पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत गल्लोगल्ली फिरत मुलीच्या आईला शोधून काढले. तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर चिमुकली आईच्या कुशीत विसावली.
पिंकी राजू राठोड (वय 2, रा. साईनाथनगर, थेरगाव) असे पोलिसांना मिळून आलेल्या चिमुकलीचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्यातील निरीक्षक (गुन्हे) राजकुमार राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास थेरगावातील सोळा नंबर बसस्टॉपजवळ मुलगी रडताना थेरगाव बीट मार्शलचे कर्मचाऱ्यांना मिळून आली. मुलगी हरवल्याची तक्रार देण्यासाठी कोणीतरी येईल, अशी पोलिसांना अपेक्षा होती. मात्र, तसे घडले नाही. यामुळे पोलीस निरीक्षक राजमाने यांनी ज्या परिसरात मुलगी मिळाली त्या परिसरात तिचा फोटो दाखवून तिच्या पालकांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केली. पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. पोलिसांनी त्या मुलीची आई रेणुका राजू राठोड (वय 25, थेरगाव) येथे शोधून काढले. तिला घेऊन पोलीस ठाण्यात आले. आईला पाहताच पिंकीने तिच्याकडे झेप घेतली. पोलिसांनाही केलेल्या कामाचे समाधान मिळाले.
पिंकी राठोड ही रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास राहत्या घराबाहेर खेळत होती. त्या वेळी तिची आई घरात काम करत होती. थोड्या वेळाने रेणुका यांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. हतबल झालेल्या रेणुका या पती कामावरून घरी येण्याची वाट पाहात बसल्या. पती कामावरून आल्यानंतर आपण पोलीस ठाण्यात जाऊ, असे त्यांना वाटले.
ही कामगिरी वाकड पोलीस ठाण्यातील निरीक्षक राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास मडके, कर्मचारी चौधर, आडके, सोनुने, आल्हाट यांच्या पथकाने केली.