मंचर – आंबेगाव तालुक्यात आठ गावांतील काही वाड्या-वस्त्यांवर करोनाबाधित रुग्ण आढळल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून हा परिसर प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. तेथील अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवहार बंद ठेवावेत, असे आवाहन प्रभारी उपविभागीय अधिकारी रमा जोशी यांनी बुधवारी (दि. 29) केले आहे.
आंबेगाव तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ज्या ठिकाणीबाधित रुग्ण आढळले आहेत तेथील परिसर प्रतिबंधित क्षेत्र आणि पाच किलोमीटरपर्यंतचे क्षेत्र बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. घोडेगांव येथील नारोडी शिवेलगतची पिचखेल वस्ती,निरगुडसर येथील वळसेमळा, अवसरी खुर्द गावठाण, रांजणी येथील माळवाडी, पोंदेवाडी येथील रोडेवाडी फाटा परिसर,गावडेवाडी गावठाण, पेठ येथील माळवस्ती, मेंगडेवाडी गावठाण, महाळुंगे पडवळ येथील आवटेमळा येथे करोनाबाधित रुग्ण आढळले असल्याने हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. हा भाग केंद्रस्थानी धरून पाच किलोमीटरचा परिसर बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्र आणि बफर क्षेत्रातमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवावेत. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. तोंडाला मास्क लावावा. सॅनिटायझरचा वापर करावा.नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.