रेल्वे स्थानक परिसरात थुंकणे, कचरा टाकल्यास 250 ते 500 रुपये दंड
– कल्याणी फडके
पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील स्थानकांवर स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्यास आता तुम्हालाही दंड होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेनुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. देशातील पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानक परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यांत केलेल्या कारवाईत सुमारे 179 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल 24 हजार 950 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकांतील कोपरे, प्लॅटफॉर्म, जिने, आरक्षण खिडकीच्या आसपासचा परिसर, प्रतीक्षा कक्ष, पादचारी पूल आदी ठिकाणांवर दिसणाऱ्या पिचकाऱ्या, कचरापेटी ऐवजी “कोठे’ही टाकण्यात येणारी “रॅपर्स’ आणि कचरा सातत्याने टाकल्याचे दिसते. नागरिकांकडून पान, गुटखा यासारखे पदार्थ खाऊन पिचकाऱ्या मारणे, कागदांचे तुकडे, प्लॅस्टिक पिशव्या टाकण्याचे एक ना अनेक प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे साहजिकच स्थानकांच्या परिसरामध्ये “अस्वच्छता’ आढळून येते.
मात्र, आता “अशा’ कृत्यांमधून स्थानक अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या नियम न पाळणाऱ्या नागरिकांचे प्रमाण लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांना “या’ व्यक्ती आढळून आल्यास 250 ते 500 रुपयांपर्यंत दंड करण्यात येणार आहे. वारंवार स्थानक परिसरामध्ये रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता राखण्यात येते. परंतु बहुतांश नागरिकांकडून ही स्वच्छता टिकवून ठेवण्यामध्ये सहभाग “शून्य’ सहभाग दिसतो. त्यामुळे कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.