24 तासांत पोलिसांनी मुलाचा घेतला शोध
पुणे – मित्रांबरोबर जीवाची मुंबई करावयास गेलेला अल्पवयीन मुलाची पुण्यात परतल्यावर ताटातूट झाली. घरचा पत्ता व इतर माहिती नसल्याने तो भेदरलेल्या अवस्थेत रेल्वे स्थानकावरील एका लहान मुलांच्या संस्थेला सापडला. दरम्यान, त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल नोंद झाल्यानंतर दत्तवाडी पोलिसांचे एक पथक मुंबईला त्याच्या शोधार्थ रवाना झाले होते. तेथे मुलगा न सापडल्याने परतलेल्या पथकाने पुण्यात येताच चाईल्ड हेल्पलाईनला फोन लावला. त्यांनी संबंधित मुलगा साथी संस्थेत दाखल असल्याचे सांगताच पोलीस आणि पालकांच्या जीवातजीव आला. तेथून तो मुलगा पोलिसांनी ताब्यात घेऊन नातेवाईकांकडे स्वाधीन केला.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल झांजुर्णे पोलीस शिपाई राहुल ओलेकर, संतोष सूर्यवंशी यांनी सहभाग घेऊन केली आहे.