इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये टोमॅटोच्या किंमती प्रचंड भडकल्या आहेत. या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता इराणकडून टोमॅटो आयात केले जाणार असल्याचे पाकिस्तान सरकारने बुधवारी सांगितले. इस्लामाबादमध्ये टोमॅटोच्या किंमती सध्या 300 रुपये प्रति किलोपर्यंत भडकल्या आहेत. तर पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये टोमॅटोची किंमत सरासरी 180 रुपये प्रति किलो इतकी आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या सांख्यकी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
भारताकडून टोमॅटोची आयात करणे पाकिस्तानने बंद केले आहे. त्यामुळे टोमॅटोची प्रचंड टंचाई पाकिस्तानात निर्माण झाली आहे. टोमॅटोसह अन्य आवश्यक वस्तूंचीही प्रचंड टंचाई पाकिस्तानात निर्माण झाली आहे. त्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे टोमॅटो आणि अन्य आवश्यक खाद्यपदार्थांची इराणसह अन्य देशांकडून आयात करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले.
काश्मीरच्या मुद्दयावरून पाकिस्तानने भारताबरोबरचे व्यापारी संबंध तोडून टाकले आहेत. मात्र त्यामुळे पाकिस्तानातील बाजारपेठेमध्ये खाद्यपदार्थ, भाज्य, धान्य आदींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. प्रसार माध्यमांनी मात्र या स्थितीला सरकारचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे इम्रान खान सरकारने सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्याकडे साफ दुर्लक्ष केले असल्याची टीका पाकिस्तनातील प्रसार माध्यमांनी केली आहे.