वॉशिंग्टन : इराणने अमेरिकेला राजनैतिक चिठ्ठी पाठवून सौदी अरेबियाच्या तेल प्रकल्पावरील ड्रोन हल्ल्यामागे आपला हात नसल्याचे स्पष्ट केले आहे तसेच त्यांच्या देशाविरुद्ध कुठलीही कारवाई केल्यास त्याचे प्रत्युत्तर देण्याचा इशारा देत आमच्याकडे कोणालाही प्रत्युत्तर देण्याची क्षमता असल्याचे त्यांनी इराणमधील अमेरिकी हितसंबंधांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्विस दूतावासामार्फत अमेरिकेला दिलेल्या चिट्ठित नमूद केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माइक पॉम्पिओ यांनी तेल प्रकल्पावरील हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. त्यांच्या विधानाचा इराणने पाठवलेल्या राजनैतिक नोटमध्ये निषेध करण्यात आला आहे. इराणवर कोणतीही कारवाई झाली तर लगेच प्रत्युत्तर दिले जाईल आणि ही फक्त धमकी समजू नका असेही राजनैतिक नोटमध्ये म्हटले आहे.
सोमवारी दुपारी हा संदेश पाठवण्यात आला. अमेरिकेप्रमाणे सौदी अरेबियाही इराणचा प्रतिस्पर्धी आहे. इराण या हल्ल्यामागे असू शकतो असे ट्रम्प यांनी म्हटले होते. शनिवारी अरामकोच्या दोन तेल तळांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन इराणला इशारा दिला. त्यानंतर इराणने अमेरिकेचे तळ, युद्धनौका आमच्या मिसाइलच्या रेंजमध्ये असल्याची उलटी धमकी दिली. काही महिन्यांपूर्वी इराणने अमेरिकेचे मानवरहित ड्रोन पाडल्यानंतरही असाच तणाव निर्माण झाला होता.