पुणे – राज्यातील मान्यता प्राप्त सैनिकी शाळांमधील अतिरिक्त तुकड्यांच्या शिक्षकेतर पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे.
राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरापर्यंत सैनिकी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक सैनिकी शिक्षण देणारी शाळा 1996-97 पासून सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एकूण 11 पदे मंजूर केली.
सक्षम व स्वयंसेवी व्यवस्थापनामार्फत चालवल्या जाणाऱ्या सैनिकी शाळांमध्ये इयत्ता अकरावी व नैसर्गिक वाढीने पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावीच्या वर्गामध्ये शास्त्र शाखेचा अभ्यासक्रम सुरु करण्यासही पूर्वीच मान्यता दिली. यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एकूण 11.5 पदे मंजूर झाली.
शासन निर्णयान्वये आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी राज्यातील सैनिकी शाळांना जोडून जादा तुकडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सैनिकी शाळांमधील मंजूर अतिरिक्त तुकड्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार त्यास मान्यता दिली असून त्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इ. मु. काझी यांनी काढले.