माण मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी अंतिम
प्रशांत जाधव, सातारा, दि.8
माण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे माजी नेते शेखर गोरे यांनी अखेर शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गोरे गुरुवारी (आज) मुंबईत दाखल झाले असून दुपारी तीन वाजता मातोश्रीवर त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अन्याय झाल्याचा आरोप करून शेखर गोरे यांनी खुद्द शरद पवारांनाच फलटण येथील कार्यक्रमात जाब विचारून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती.
त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी युतीचे उमेदवार खा. रणजित निंबाळकर यांचे काम करून त्यांच्या पुढील राजकीय वटचालीची चुणूक दाखवली होती.
मात्र, गोरे भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत याबाबत कुणालाच ठोस सांगता येत नव्हते. अखरे शेखर गोरे यांनी गुरूवारचा मुहूर्त साधत थेट मातोश्री गाठत हातात भगवा घेतला आहे.
शेखर गोरे यांच्या प्रवेशानंतर दुपारी तीन वाजता उध्दव ठाकरे माण विधानसभा मतदारसंघातील राजकीय नाट्यावर भाष्य करून मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मातोश्री वरील सुत्रांनी दिली.