सातारा, दि.9 (प्रतिनिधी)
जिल्हा रुग्णालयाचे सीएस असलेले डॉ. अमोद गडीकर यांच्या वाढत्या तक्रारी व कामाची पध्दत पाहून सातारा जिल्हा वैतागला होता. वांरवार त्यांच्याबाबतच्या तक्रारी वरिष्ठ पातळीवर झाल्या होत्या. अखेर त्या सर्व बाबींची दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी कराड येथील बैठीकीतच त्यांची खरडपट्टी काढून त्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.
सीएस गडीकर यांनी साताऱ्याचा कार्यभार घेतल्यापासून जिल्हा रुग्णालयाच्या प्रगतीला ब्रेक लागला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्यात धुसपूस वाढली होती. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यात दोन गट पडले होते. परिणामी रुग्णालयाच्या कामावर त्याचा परिणाम होत होता.
याबाबत गडीकरांना सामाजिक व राजकीय संघटनांनी तसेच साताऱ्यातील माध्यमांनी जागे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी सोम्या-गोम्यांच्या टोळक्याच्या नादाला लागून जिल्ह्याच्या आरोग्य मंदीराचे वाटोळे केल्याचा आरोप अनेकदा झाला होता.
त्यामुळे त्यांच्याविरोधात अनेकदा तक्रारींचा पाऊस पडला होता. त्या सर्व तक्रारींची दखल घेत राज्याच्या आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी कराड येथील बैठकीत सीएस गडीकरांची खरडपट्टी काढून जाग्यावरच बदलीचे आदेश काढून त्यांची उचलबांगडी केल्याची माहिती सुत्रांनी दिली.