बारामती तालुक्यातील 434 अंगणवाड्यातील सेविकांना मोबाइल ऍपचे प्रशिक्षण
माळेगाव – बारामती तालुक्यातील अंगणवाड्या आता लवकरच “पेपरलेस’ होणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या “सही पोषण, देश रोशन’, या उपक्रमांतर्गत “आयसीडीएस सीएएस’ या मोबाइल ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना चार टप्प्यात सदर ऍपचे प्रशिक्षण देण्यात येणार असून याची सुरूवात माळेगाव येथून करण्यात आली असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या ऍपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध प्रकारच्या नोंदी ठेऊ शकणार आहे. नोंदी ठेवण्यासाठी त्यांना स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या माध्यमातून अंगणवाड्या चालविण्यात येतात. अंगणवाड्यात येणाऱ्या मुलांची व त्यांना देण्यात येणाऱ्या आहाराबाबतची माहिती रजिस्टरमध्ये नोंदविण्यात येत होती. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत होते. त्यावर मार्ग म्हणून केंद्र सरकारच्या “सही पोषण, देश रोशन’ या उपक्रमांतर्गत आयसीडीएस सीएएस या मोबाइल ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अंगणवाड्यातील कारभाराबाबतच्या रजिस्टरच्या कागदावरील नोंदी हद्दपार होणार आहेत. आता, त्याची जागा मोबाइल ऍपने घेतली आहे. अंगणवाड्यामधून या अँपद्वारे लसीकरण, गृहभेटीच्या दैनंदिन नोंदी, बालकांच्या नोंदी, कुंटुंब व्यवस्थापन, दररोजचे पोषण, मुलांच्या वाढीची देखरेख, घरपोच आहार, मासिक प्रगती अहवाल, किशोरवयीन मुली, सामुदायिक आधारिक कार्यक्रम, अंगणवाडी केंद्राचे व्यवस्थापन अपेक्षित कामांची यादी आदी बाबी यात नोंदविल्या जाणार आहेत.
राज्य शासनाकडून प्रत्येक अंगणवाड्यांना स्मार्ट दुरध्वनी संच देण्यात येत आहे. हे स्मार्ट फोन बारामती तालुक्यातील 434 अंगणवाड्यांना देण्यात आले आहेत. आयसीडीएस सीएएस या मोबाइल ऍपमध्ये माहिती कशी भरायची याचे प्रशिक्षण अंगणवाडीतील सेविकांना दिले जात आहे.तालुक्यात चार टप्प्यात याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षणांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. लवकरच तालुक्यातील सर्व अंगणवाड्या पेपरलेस होऊन स्मार्ट होणार आहेत. त्यामुळे नोंदवहीतील दैनंदिन नोंदीचे काम कमी होणार असून तालुक्यातील अंगणवाड्यातील कर्मचाऱ्यांचे व सेविकांचे कामकाज सोपे होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या मोबाइल ऍपद्वारे विविध प्रकारच्या नोंदी केल्या जाणार आहेत, त्यामध्ये अंगणवाडीत पूरक पोषण आहार, औषध वाटप, बालकांचे वेळोवेळी वजन घेणे, गर्भवती माता लसीकरण या कामांचा समावेश आहे. या सर्व कामांचा अहवाल अंगणवाडी सेविकांना केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागतो. तो आता स्मार्ट फोनद्वारे देता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे या कामांना गती मिळणार आहे. तसेच या नोंदी वरिष्ठांनाही ऑनलाइन पाहता येणार असल्याने अंगणवाड्या पेपरलेस होण्याच्या मार्गावर आहे.
- या ऍपमुळे अंगणवाडी सेविका वेळेवर येऊन अंगणवाडी उघडून अंगणवाडीची वेळ, पोषण आहार, बालकांची उपस्थिती, स्वच्छता, आरोग्य याबाबत पारदर्शकता येणार असून ही सर्व माहिती ऑनलाइन भरुन केंद्रीय महिला व बालविकास अधिकाऱ्यांना थेट पोहचणार असून त्याची नोंद घेतली जाणार आहे. बारामती विभागात 416 अंगणवाडी सेविका, 16 पर्यवेक्षिका, 2 डाटा ऑपरेटर आहेत.
- अंगणवाड्यांना स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्यात आले असून इंटरनेटसाठी लागणारे पैसे अंगणवाडी सेविकांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. या ऍपमुळे अंगणवाड्या पेपरलेस होणार असून कामाची गती वाढून कामात पारदर्शकता येणार आहे.
– मिथुनकुमार नागमवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती,बारामती - या ऍपमुळे अंगणवाड्यातील कामकाजांच्या नोंदी रजिस्टर ऐवजी स्मार्ट मध्ये केल्या जाणार असल्याने अंगणवाडी सेविकांच्या कामाचा ताण कमी होणार आहे.
पुनम मराठे, विस्तार अधिकारी, बारामती