४८ वर्षांपूर्वी प्रभात : देशातील समाज विकास योजना एकमेकांशी जोडण्यात येणार

नवी दिल्ली, ता. 26 – देशातील वेगवेगळ्या ग्रामीण विकास कार्यक्रमांना एकत्र जोडणारे विकास कार्यक्रम सुरू करणे आता आवश्‍यक झाले आहे, अशी सूचना कृषिखात्याचे राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांनी आज येथे केली. ते पुढे म्हणाले, ही नवी योजना देशातील 5 हजार समाज विकास योजनांना लागू करण्यात येईल. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊन तेथे आर्थिक
लाभ घडेल.

परीक्षा पद्धती सुधारणा योजनेसाठी पुणे विद्यापीठाची निवड झाली

नवी दिल्ली – विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा पद्धती सुधारणा योजनेसाठी देशातील
12 विद्यापीठांची निवड केली आहे. त्यात पुणे विद्यापीठाचा अंतर्भाव आहे. उत्तर पत्रिकांवरून गुणांद्वारे मूल्यमापन करण्याच्या सध्याच्या पद्धतीऐवजी “ग्रेडिंग’ पद्धतीचा सुधारणा योजनेत अंतर्भाव आहे.

गरीब व श्रमिकांनी लढा उभारला पाहिजे

पुणे – गरीब व श्रमिक यांनी लढा उभारून प्रतिगामी शक्‍तींचा अडसर नष्ट केला पाहिजे. साठेबाज व नफेखोर हे कायद्यातून पळवाट काढून गरिबांची पिळवणूक करीत असतील तर त्यांना धंदा करणे मुश्‍कील करून सोडले पाहिजे, असे उद्‌गार केंद्रीय नियोजनमंत्री
ना. मोहन धारिया यांनी नुकतेच घोरपडे पेठेतील हातगाडी युनियनच्या जाहीर सभेतील भाषणात काढले.

भुट्टोंच्या सामानाची क्ष-किरण तपासणी

न्ययॉर्क – अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याने केलेल्या सूचनेनुसार येथील विमानतळावर पाकचे पंतप्रधान झेड. ए. भुट्टो यांच्या सामानाची क्ष-किरण तपासणी करण्यात आली. भुट्‌टो पाकला परत जाण्यासाठी निघाले होते. यामुळे त्यांना प्रवासास दोन तास उशीर झाला. या तपासणीसंबंधी पोलिसांकडून काही खुलासा करण्यात आला नाही. भुट्‌टो यांच्या बरोबर 70 मित्रमंडळी होती व काही पत्रकारही होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.