३९ प्रकल्पबाधितांना २७ लाख रुपयांचे वाटप

उरुल लघुपाटबंधारे तलावातील भूसंपादित केलेल्या बोडकेवाडी येथील शेतकऱ्यांचा समावेश

मल्हारपेठ – उरुल येथील लघुपाटबंधारे तलावातील भूसंपादन केलेल्या बोडकेवाडी येथील 181 पैकी 39 प्रकल्पबाधित खातेदार शेतकऱ्यांना भुसंपादनापोटी 27 लाख 2 हजार 489 रुपयांचे वाटप भूसंपादन विभागाकडून नुकतेच करण्यात आले.उर्वरित खातेदारांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबधित खातेदारांच्या बॅंक खात्यांवर रक्कम एन. एफ. टी. प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती भूसंपादन विभागाचे मंडलाधिकारी सी. एल. सावंत यांनी दिली. यामुळे उरुल, बोडकेवाडी येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उरुल, ता. पाटण येथील लघुपाटबंधारे तलावामध्ये भूसंपादन केलेल्या जमिनीतील खातेदार शेतकऱ्यांना भूसंपादन विभागांकडून 4 कोटी 50 लाख रुपयांच्या निधी वाटप प्रक्रियेला ऑक्‍टोंबर 2018 पासून सुरुवात झाली होती. संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा बजावून योग्य त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे उरुलसाठी 19 व 20 तारखेला व ठोमसेसाठी 22 व 23 तारीख देऊन भूसंपादन विभागाकडून खातेदारांचे सातबारा, वारस व मालकी, फेरफार, बॅंक जोडपत्र, आधारकार्ड, प्रतिज्ञापत्र, संपादित जमिनीचे 7/12 वर बॅंक, विकास सोसायटी वा अन्य संस्थेचा अगर व्यक्तीचा कर्ज वा इतर रक्कमेचा बोजा नोंद असल्यास नाहरकत प्रमाणपत्र भरुन घेण्याचे काम चालू होते.

यामध्येच भूसंपादन विभागाकडून बोडकेवाडी येथील 181 खातेदारांना नोटीस देण्यात आलेल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र संबंधित शेतकरी व ग्रामस्थ यांनी योग्य तो पाठपुरावा केल्यामुळे लवकरच प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रत्यक्षात 22 व 23 जानेवारी 2019 ला खातेदारांना कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी बोलावण्यात आले होते. यामध्ये 39 खातेदार शेतकऱ्यांनी योग्य ती कागदपत्रे दिल्यामुळे त्यांची प्रकरणे पात्र करण्यात आली आहेत. बोडकेवाडीच्या 181 खातेदारांना एकूण 85 लाख 55 हजार 186 रुपयांपैकी 39 खातेदारांना 27 लाख 2 हजार 489 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

उर्वरीत 58 लाख 52 हजार 697 रुपयांची रक्कम योग्य त्या कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर संबंधित खातेदार शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. यामध्ये अनेक खातेदार शेतकऱ्यांच्या सातबारावर कुळांची नावे असल्यामुळे त्यांची सहमती आवश्‍यक आहे. काहींच्या किचकट बाबीमुळे वारसनोंदी, किरकोळ, त्रुटीमुळे येथील शेतकऱ्यांत प्रश्नचिन्ह निर्माण झाले उर्वरित रक्कम कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच उर्वरित अनेक खातेदारांचे भूसंपादन होवूनही नुकसान भरपाईत नाव न आल्याने अनेक खातेदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. बाधित क्षेत्र असतानाही जमिनीची भरपाई व भूमापन प्रक्रियेत सावळा गोंधळ उडाल्याने बाधित शेतकरी सध्याच्या लाभापासून वंचित राहिले असल्याने बाधित शेतकऱ्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नुकसान भरपाईच्या पैशापायी घराघरात वादाला पेव फुटले आहेत. गेल्या दहा वर्षापासून उरुल लघुपाठबंधारे प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पात उरुल, ठोमसे, बोडकेवाडी येथील 36 हेक्‍टर क्षेत्र प्रभावित झाले आहे. सद्य स्थितीला प्रकल्पाची अर्धी भिंत बांधून तयार आहे. ते दोनवेळा उत्खनन केलेल्या क्षेत्राचे भाडेही वाटप केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)