१५ वर्षांपूर्वीचा मारुतीचा आयपीओ आणि…

2003 साली सरकारने ‘मारुती’मधील आपला हिस्सा विकायचे ठरवले व मारुतीचा पब्लीक इश्शु बाजारांत आला..तेव्हा बाजार सुमारे २/३ वर्षे मंदीच्या गटांगळ्या खात होता. धंदा करणे मोठे जिकिरीचे झाले होते.अशातही  ह्या इश्शुचे फॉर्म्स घेवून मी ओळखीच्या काही निवडक क्लायंट्सकडे मनाचा हिय्या करुन जायचो आणि “बघा… चांगली कंपनी आहे…..” वगैरे पोपट्पंची करायला सुरवात करायचो.

गंमतीचा भाग असा की बहुतेकदा साहेबांकडे/मॅडमकडे ही मारुती 800 गाडी असायचीच, ते उलट मलाच ती गाडी किती चांगली चालते, रिलाएबल कशी आहे, कोणताही त्रास नाही देत, अशा गोष्टी सांगायचे, आणि “अर्ज करायलाच हवा…का” असे म्हणुन फॉर्म भरायचे.

तुम्हाला सांगतो, मला यापूर्वी कधीही कोणत्याही प्रॉडक्टबद्दल इतका असा सकारात्मक अनुभव आला नव्हता. त्या, मारुतीच्या इश्शुमध्ये माझ्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतले सर्वाधिक अर्ज भरले गेले होते. त्या वेळी अर्ज केलेल्या जवळपास सर्वांनाच मारुतीचे शेअर्स फक्त रु 125 मध्ये मिळाले होते. (आजचा भाव रु. 7000+आहे.)

हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे पुण्यात आल्यापासून आधी फ्लॅट घेणे, मग यथावकाश त्याचे नूतनीकरण, गावाकडील बंगल्याचे बांधकाम या व अशा किमान अर्धा डझन प्रसंगात मला ‘ईलेक्ट्रिफिकेशन’ या अजिबात गम्य नसलेल्या विषयाला सामोरे जावे लागले. या जवळजवळ सर्वच ठिकाणी एक मुद्दा मात्र समान असायचा..या कामाकरिता इच्छुक कॉन्ट्रेक्टर गुणवत्तेची हमी देताना एक गोष्ट हमखास सांगायचे…” आम्ही फक्त पॉलिकॅब वायर्स वापरतो. “पॉलिकॅब इंडिया लिमिटेडच्या शेअर्सचा आयपीओची विक्री ९ एप्रिलला बंद होणार आहे. हा शेअर त्या वेळच्या मारुतीइतका स्वस्त नसला तरी शहाण्यास अधिक सांगणे न लगे!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.