रोम – जगात 24 लाख 99 हजार 501 जणांना करोनाची बाधा झाली आहे. तसेच 6 लाख 58 हजार 030 जणांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. इटलीचे पंतप्रधान गिउसेप कोंटे यांनी अर्थव्यवस्था पुन्हा खुली करण्याची सूचना नागरिकांना दिली आहे. देशाला सतर्क राहण्याची गरज असून 4 मेपासून अर्थव्यवस्था खुली करण्याच्या योजनेला अंतिम स्वरुप दिले जात असल्याचे ते म्हणाले.
महामारीस प्रारंभ झाल्यापासून पहिल्यांदाच इटलीतील रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सिव्हिल प्रोटेक्शन एजेंन्सी प्रमुख अँजेलो बोरेली यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. तेथील एकूण रुग्णांची संख्या आता 1,81,228 वर पोहोचली आहे. यातील 1 लाख 8 हजार 237 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत किंवा घरातच क्वारेंटाईनमध्ये आहेत. रविवारी देशात 486 बाधितांची भर पडली होती. अमेरिका आणि स्पेननंतर इटलीत सर्वाधिक रुग्ण आहेत. इटलीत आतापर्यंत 24,114 जणांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण कोरियात दिवसभरात 9 नवे बाधित सापडल्याने एकूण रुग्णांची संख्या आता 10 हजार 683 झाली आहे. तर देशात 232 जणांना जीव गमवावा लागला आहे. मागील 4 दिवसांपासून नव्या रुग्णांचा आकडा 20 पेक्षाही कमी राहिला आहे. तर लेबनॉन, इराक आणि सीरियाने रमझानकाळात कोरोनाच्या धोक्यामुळे लागू करण्यात आलेली संचारबंदी 21 एप्रिल ते 22 मेपर्यंत संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु संबंधित निर्बंध शुक्रवार आणि शनिवारी पूर्णपणे लागू राहणार आहेत.
अमेरिकेत दिवसात 1939 बळी
अमेरिकेत 24 तासांत 1939 जणांचा मृत्यू झाला असून 28 हजार 123 रुग्ण सापडले आहेत. देशात 42 हजार 514 जणांना जीव गमवावा लागला आहे. विषाणूपासून वाचण्यासाठी आणि नागरिकांचा रोजगार राखण्यासाठी विदेशी नागरिकांचे स्थलांतर तात्पुरत्या स्वरुपात बंद केला जाणार असल्याची घोषणा अध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. हिंदू संघटनांच्या समुहाने भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. हिंदू युवा, भारतीय, विवेकानंद हाउस आणि सेवा इंटरनॅशनलने संयुक्तपणे “कोविड-19 स्टुडंट सपोर्ट नेटवर्क’ या नावाने उपक्रम सुरू केला आहे. न्यूयॉर्कच्या रुग्णालयात भारतीय डॉक्टर माधवी अया यांचा संसर्गामुळे मृत्यू झाला होता. सर्वाधिक बाधित भारतीय डॉक्टर न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीत आहेत. किमान 10 डॉक्टर्सची प्रकृती गंभीर आहेत. किडनीरोग तज्ञ प्रिया खन्ना (43 वर्षे) यांचे निधन झाले आहे. त्यांचे वडिल तसेच सर्जन सत्येंद्र खन्ना यांनाही लागण झाली आहे.
ऑस्ट्रेलिया दिवाळखोर?
ऑस्ट्रेलियात शटडाउन आणि उद्योग बंद करण्यात आल्याने सुमारे 7 लाख 80 हजार नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत. ऑस्ट्रेलियन सांख्यिकी विभाग आणि टॅक्सेशन ऑफिसच्या आकडेवारीनुसार 14 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत 6 टक्के नोकऱ्या कमी झाल्या आहेत. देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी व्हर्जिन ऑस्ट्रेलियाने मंगळवारी कर्ज संकटातून बाहेर पडण्यासाठी दिवाळखोरी कायद्यांतर्गत संरक्षण मागितले आहे.
इम्रान खान सेल्फ क्वारेंटाईनमध्ये
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सेल्फ क्वारेंटाईनमध्ये जाऊ शकतात. मागील आठवडयात एका कोरोना पॉझिटिव्ह युवकाच्या संपर्कात ते आले होते. 15 एप्रिल रोजी इम्रान हे, समाजसेवक अब्दुल सत्तार ईदी यांचे पुत्र व ईदी फौंडेशनचे अध्यक्ष फैसल ईदी यांना भेटले होते. पंतप्रधानांवर भेटल्यावर ईदी यांच्या फ्ल्यूची लक्षणे दिसून आली होती. चाचणी केली असता ईदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
रशियात 5,642 नवे रुग्ण
रशियात 5642 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण रुग्णांचा आकडा आता 52,763 झाला आहे. तर दिवसभरात 51 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा 456 झाला आहे. रशियातील करोना संकट अद्याप टोकाला पोहोचलेले नसल्याचे म्हणत राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी देशवासीयांना इशारा दिला आहे. तर व्लादिकाव्काजमध्ये नोकऱ्या गेल्याने तसेच करोनासंबंधी माहिती दडवून ठेवण्यात आल्याप्रकरणी निदर्शने सुरू आहेत.
फ्रान्समध्ये 20 हजारपेक्षा अधिक मृत्यू
फ्रान्समध्ये बळींचा आकडा 20265 वर पोहोचला आहे. हे आकडे अत्यंत दुःखद असल्याचे विधान फ्रान्सच्या सेवा संचालकाने केले आहे. दिवसभरात तेथे 547 जणांचा मृत्यू झाला असून 2,489 नवे रुग्ण सापडले आहेत. फ्रान्समध्येही लॉकडाउनला विरोध सुरू झाला आहे. पॅरिसमध्ये रविवारी लॉकडाउनच्या विरोधात दंगल भडकली आहे. लॉकडाउनचे पालन सुनिश्चित करताना पोलिसांनी वंशभेदी भूमिका स्वीकारल्याचा आरोप केला जात आहे.
तुर्कस्तानात आकडेवारी संशयास्पद
तुर्कस्तानात रुग्णांची संख्या चीनपेक्षाही अधिक झाली आहे. तेथील एकूण बाधितांचा आकडा आता 90,980 झाला आहे. तेथील बळींचा आकडा 2,140 झाला आहे. परंतु देशात याहून अधिक संख्येत लोकांचा जीव गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. इस्तंबूल शहरात 9 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत या शहरातच 2,100 जणांचा मृत्यू झाला असावा. पश्चिम आशियात आता तुर्कस्तानातच सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. रुग्णसंख्येत तुर्कस्तानने इराणला मागे टाकले आहे.