हॉटेल व्यावसायिकांचा कचरा रस्त्यावरच !

पिंपरी – महापालिकेच्या घंटागाड्यांमध्ये कचरा देण्याऐवजी संत तुकारामनगर परिसरातील बहुसंख्य हॉटेल व्यावसायिक मोकळी जागा मिळेल तेथे कचरा टाकत आहेत. त्यामुळे या भागात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असतानाच नागरिकांचे आरोग्य देखील धोक्‍यात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच), डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल तसेच महाविद्यालये यामुळे संत तुकारामनगर परिसरात छोट्या-मोठ्या हॉटेल्स, खानावळींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शहरातील हॉटेल, कारखान्यांमधील कॅन्टीन तसेच अन्य खाद्यपदार्थ उत्पादन व विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडून निर्माण होणारे टाकाऊ अन्न पदार्थ महापालिकेकडून दररोज गोळा केले जाते. मोशी येथील कचरा डेपोमध्ये त्याची विल्हेवाट लावली जाते. हे अन्न पदार्थ गोळा करणे, त्याची कचरा डेपोपर्यंत होणारी वाहतूक आणि विल्हेवाटीसाठी संबंधित व्यावसायिकांना महापालिका वार्षिक शूल्क आकारले जाते. हॉटेल्सच्या वर्गवारीनुसार हे शूल्क निश्‍चित करण्यात आले आहे.

तथापि, संत तुकारामनगर परिसरातील छोटे हॉटेल व्यावसायिक, चायनिज खाद्यपदार्थ विक्रेते, खानावळ तसेच ज्युस सेंटर हे महापालिकेच्या घंटागाडीत कचरा न देता रात्रीच्या अंधारात कचरा कुंड्या, एच. ए. मैदान तसेच डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय अशा मोकळी जागा दिसेल त्याठिकाणी कचरा टाकत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर या भागात मोठ्या प्रमाणावर रसवंती गृह सुरू झाले आहेत. येथील ऊसाचा चोथा देखील रस्त्यावरच टाकला जातो. परिणामी याठिकाणी अन्नाच्या शोधात भटक्‍या जनावरे कायम दिसून येतात. कचऱ्याला सुटलेली दुर्गंधी, रस्त्यावर विखुरलेल्या कचऱ्याचे ओंगळवाणे दृश्‍य पहायला मिळत आहे. एकीकडे महापालिका स्वच्छ भारत अभियानावर लाखो रुपये खर्च करत असताना दुसरीकडे स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या संतापात भर घालत आहे.

कचऱ्यात पुन्हा प्लास्टिक…
राज्य शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर रस्ते तसेच कचरा कुंड्यांमधील कचऱ्यांमध्ये प्लास्टिक पहायला मिळत नव्हते. मात्र, अवघ्या दोन-तीन महिन्यातच प्लास्टिक बंदीचा बोजवारा उडाला. त्यामुळे कचऱ्याचे ढिग, कचराकुंड्या, तसेच रस्त्याच्या दुतर्फा प्लास्टिक पिशव्यांचा कचरा दिसत आहे. अन्नाच्या शोधात प्लास्टिक पिशव्या मोकाट जनावरांच्या पोटात जात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.