हे असले कसले पंतप्रधान?

दिल्लीतील जनआक्रोश रॅलीत राहुल गांधींची मोदींवर चौफेर टीका
नवी दिल्ली – कॉंग्रेस तर्फे आज दिल्लीतल्या रामलिला मैदानावर जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुलच या रॅलीत कॉंग्रेसने वाजवला. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली. ते म्हणाले की पंतप्रधान दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले पण तेथे ते हात बांधून शी जिनपिंग यांच्या समोर उभे राहिलेले दिसले. या दोन दिवसांच्या चर्चेत त्यांनी चीनने भारतात डोकलाम मध्ये केलेल्या आक्रमणावर एक चकार शब्दही काढला नाही हे असले कसले पंतप्रधान आहेत असा सवाल त्यांनी केला. आगामी काळात कर्नाटकसह विविध राज्यांतील निवडणुका कॉंग्रेसच जिंकेल आणि सन 2019 च्या निवडणुकीतही कॉंग्रेस सत्तेवर येईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

या रॅलीला कॉंग्रेसचे सर्व प्रमुख नेते व विविध राज्यांतील आजी-माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. गेले काही दिवस आजारी असलेल्या पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग हेही यावेळी उपस्थित होते. या रॅलीला मोठी गर्दी झाली होती. या रॅलीसाठी देशभरातून कॉंग्रेसचे कार्यकर्ते आले होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की या रॅलीला जनआक्रोश रॅली असे नाव देण्यात आले आहे. आज मी देशात जिथे कोठे जातो तेथे एक प्रश्‍न हमखास विचारतो की तुम्ही मोदी सरकारच्या कारभारावर खूष आहात काय? त्याला प्रत्येकाकडून नाही असेच उत्तर येते.

आज देशातील सारेच वर्ग सरकारच्या विरोधात आक्रोश करीत आहेत. त्यांचा हुंकार देशाच्या सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा उल्लेख त्यांनी शेर के बच्चे असा केला त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला. ते म्हणाले की देशातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आम्ही काम करू. आम्ही सर्व घटकांमध्ये प्रेम निर्माण करू.आम्ही प्रेम आणि सद्‌भावना निर्माण करणारे लोक आहोत पण भाजप आणि संघाचे लोक मात्र द्वेषच पसरवण्याचे काम करीत आहेत असे ते म्हणाले.

मोदी सरकारने देशातल्या कृषी क्षेत्राची वाट लावली असे सांगताना राहुल गांधी म्हणाले की हे सरकार उद्योगपतींचे कर्ज एका झटक्‍यात माफ करू शकते पण ते शेतकऱ्यांची कर्जे माफ करू शकत नाहीत. कॉंग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे म्हणूनच आज निदान तोंडदेॅखलेपणाने तरी ते शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करतात अन्यथा कॉंग्रेस तेथे नसती तर मोदींनी शेतकऱ्यांची प्रत्येक इंच जमीन संपादीत केली असती असा आरोपही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)