हुंडा ( प्रभात शॉर्टफिल्म कॉर्नर)

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हुंडा एक अनिष्ट प्रथा आहे. हुंडा देण्यास आणि घेण्यास विरोध दर्शविला पाहिजे. असं सगळे जण म्हणतात. परंतु प्रत्यक्षात हे फक्त बोलण्यापुरतंच मर्यादित आहे. मुलगी सुशिक्षित असू अथवा अशिक्षित तिचे जेव्हा लग्न ठरते. तेव्हा देवाण घेवाणीचा विषय ओघाने पुढे येतोच. हुंडा हा फक्त पैश्‍यांच्या माध्यमातूनच नव्हे तर वस्तूंद्वारे ही स्विकारला जातो. हुंडा देण्यास एखाद्या मुलीने किंवा तिच्या कुटुंबीयांनी विरोध केल्यास लग्न मोडले जाते. काही ठिकाणी मुलगा जितका जास्त शिकलेला असेल त्यानुसार हुंडा घेतला जातो. अनेक मुलींचे कुटुंबीय मुलीच्या प्रेमापोटी हुंडा देतात.

हुंडा दिल्याची वाच्यता कुठेही न करता तो वस्तू , दागदागिने अशा स्वरूपात दिला जातो. काही ठिकाणी सुनेने हुंडा आणला नाही किंवा कमी हुंडा दिला म्हणून सुनेला मारहाण केली जाते तर प्रसंगी सुनेला जीवे मारले जाते. हुंडा हा लोकांसाठी प्रतिष्ठेचा विषय असतो. हुंड्यासारख्या कुप्रथेला आळा घालण्यासाठी मोर्चे, आंदोलन झाली तरी परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. हुंड्यामुळे अनेकजणींनी आपले प्राण गमावले. तरी देखील या विषयाकडे गांभीर्याने पहिले जात नाही. हुंडा या कुप्रथेला वाचा फोडण्यासाठी दिग्दर्शक सागर अरगडे यांनी ‘हुंडा’ या लघुकथेतून एका तरुणीची कथा मांडली आहे.

इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्या या तरुणीची ही कथा आहे. शिक्षणासाठी होस्टेलवर राहणाऱ्या विद्याला बाबांचा फोन येतो, अन तिला कांदा पोह्यांच्या कार्यक्रमासाठी घरी बोलवले जाते. ती लगेच दुसऱ्या दिवशी घरी जाते. मुलाकडची मंडळी येतात तिला पाहून जातात. त्या रात्री विद्याच्या बाबांना झोप येत नाही. डोक्‍यावर कर्जाचा डोंगर, त्यात गावात पडलेला दुष्काळ अशा परिस्थितीत मुलाकडच्यांनी लाख रुपये मागितलेला हुंडा कसा द्यायचा या विचारात ते असतात. विद्याची आई त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. आई – बाबांचा संवाद ऐकून विद्याच्या डोळ्यात पाणी येते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुन्हा होस्टेलला जाते. होस्टेलवर आल्यावर काहीशी निराश होऊन ती विचारांच्या गुंत्यात अडकलेली असते. जेवण करण्यासाठी मैत्रिणी तिला चल म्हणतात. तर ती टाळाटाळ करते. मैत्रिणी गेल्यावर ती एक पत्र बाबांसाठी लिहिते. त्यात ती म्हणते, माफ करा बाबा मला.. मला माहित आहे मी जे करतीये ते चुकीचं आहे. पण करू काय मला दुसरा मार्गच दिसत नाही. मी फार विचार केला पण मला काहीच सुचत नाहीये. हुंडा मागणारी मुलं आणि त्यांचे आई – वडील यांना वैतागले मी आता.. माझ्या लग्नासाठी मला तुमच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर नाही उभारायचा.. माझ्यासाठी तुम्ही आजवर खूप कष्ट घेतले आहेत हे माहित आहे मला.. पण या नराधमांना हुंडाच हवा आहे. माझ्या लग्नाची फार काळजी आहे सर्वाना. बाहेर गेल्यावर लोकांना तोंड द्यावं लागत तुम्हाला.. मला हे नाही पाहवत. बास करा बाबा आता मुलं पाहून पाहून तुमच्या चपला झिजल्या मला हे पाहवत नाही बाबा.. म्हणून मी आत्महत्या करतीये.. पत्र लिहिल्यानंतर ती रूममध्ये फाशी घेणार तेवढ्या तिची मैत्रीण येते न जोरात ओरडते. मैत्रीण आल्यामुळे विद्याचे प्राण वाचतात.

विद्या सारखाच विचार करणाऱ्या अनेक मुली समाजात आहेत. केवळ हुंड्यामुळे त्या आपले प्राण गमावतात. हुंड्या सारख्या निष्ठुर प्रथेला आळा घालण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे गरजजेचे आहे. तरच समाजात बदल घडू शकतो.

 गायत्री तांदळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)