हिवरेच्या सरपंच माया जगताप यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर

शिक्रापूर- हिवरे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतच्या नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत महिला सरपंच माया सुनील जगताप यांच्यावर ग्रामपंचायतच्या पाच सदस्यांनी अविश्वास ठरावसाठी शिरूर तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्याबाबत गुरूवारी (दि.30) घेण्यात आलेल्या अविश्वास ठराव मतदान प्रक्रियेत 7 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सरपंच माया जगताप यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. परिणामी सरपंच जगताप यांना पदावरून पायऊतार व्हावे लागले आहे.
हिवरे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतच्या महिला सरपंच माया सुनील जगताप या महिला सरपंच सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांना अरेरावी करतात. पदाचा गैरवापर करतात, सरपंचांचे पती कारभारात हस्तक्षेप करतात. सरपंच मासिक सभेच्या ठरावाची अंमलबजावणी करत नाहीत, ही कारणे अविश्वास ठरावासाठी देण्यात आली आहेत. महिला सरपंच माया जगताप यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी राहुल टाकलकर, राजाराम गायकवाड, विकास शिर्के, दैवशाला झेंडे आणि रुपाली गायकवाड यांनी शिरूर तहसीलदार कार्यालय येथे अर्ज दाखल केला होता.

  • अशी राबविली मतदान प्रक्रिया
    यावेळी अविश्वास ठराव दाखल केलेले ग्रामपंचायत सदस्य राहुल टाकलकर, राजाराम गायकवाड, विकास शिर्के, दैवशाला झेंडे, रुपाली गायकवाड तसेच उपसरपंच कौशल्या गुंजाळ आणि सीताबाई मांदळे हे उपस्थित होते. तर तहसीलदार रणजीत भोसले आणि ग्रामविकास अधिकारी आरती गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली मतदान प्रक्रिया सुरु होताना सर्व सदस्यांनी हात वर करून मतदान करण्याचे ठरविले. हात वर करून मतदान घेण्यात आले. यावेळी उपस्थित सातही सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने सरपंच माया जगताप यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाल्याचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी जाहीर केले.
  • सरपंच यांच्या गैरहजेरीचे कारण काय?
    विधान परिषदेचे माजी उपसभापती कै. वसंतराव डावखरे यांनी 1985 साली हिवरे या गावचे सरपंचपद भूषवले होते.गावच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या अविश्वास ठरावाकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले होते. तर, गुरूवारी अविश्वास ठरावाचे घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत सरपंच माया जगताप स्वतः गैरहजर होत्या. तसेच माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमोल जगताप हे देखील गैरहजर होते. परंतु अमोल जगताप यांच्या गैरहजेरीचे कारण समजू शकले नाही.
  • राजकीय हेतूने माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. तसेच एका माजी सरपंचाने राजकीय स्वार्थापोटी गावात अविश्वासाचे वातावरण तयार केले. मी राजीनामा देणार असताना देखील माझ्यावर अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला.
    – माया जगताप, सरपंच, हिवरे ग्रामपंचायत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)