हिमालय कन्या बचेंद्री पाल

स्वत:च्या कर्तृत्ववान आयुष्यातून असंख्य आयुष्य घडवीत गेली साडेतीन दशके सार्वजनिक जीवनामध्ये आपले भरीव योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणजे बचेंद्री पाल होय. पाल या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय आणि जगातील पाचव्या महिला आहेत. 23 मे 1984 रोजी बचेंद्री पाल यांनी जगातील सर्वोच्च शिखर एवरेस्ट (8848 मी.) सर केले. त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपल्या नावाची नोंद केली. त्यांचा हा विक्रम समस्त भारतीय महिलांसाठी आजही अभिमानास्पद आहे. आज पाल यांचे नाव पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आहे, त्याचे कारण म्हणजे भारत सरकारने पद्मभूषण या नागरी सन्मानासाठी त्यांची निवड केली आहे.

24 मे 1954 मध्ये उत्तरकाशी जिल्ह्यातील नकुरी या गावी बचेंद्री पाल यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती जेमतेम होती. त्यांचे कुटुंब ग्रामीण भागात राहात असल्यामुळे तत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षणाचे काही महत्व तेथील लोकांना माहिती नव्हते. विशेषतः मुलींनी केवळ चूल आणि मुल इतकाच काय तो विचार केला पाहिजे अशी स्थिती होती. मात्र, या धारणांना बदलत या मुलीने शिक्षणासाठी आपला संघर्ष चालू ठेवत, एम.ए.बी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. इतके शिक्षण शिकणारी ही त्यांच्या गावातील पहिलीच मुलगी होती. या

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान तिच्या लग्नाचा विचार, मुलींनी कुठे शिकायचे असते का, शिकून आता नोकरी नाहीतर इतके शिक्षण घेतलेच कशाला? अशा असंख्य प्रश्‍नांना सामोरे जात असताना तिला स्वतःला सिद्ध करण्याची एक वेगळी वाट मिळाली. ती वाट होती गिर्यारोहणाची!

पाल या हिमालयात राहात असल्यामुळे गिर्यारोहणाचे मूलभूत प्रशिक्षण दररोजच्या दिनचर्येतून झालेच होते. आता गरज होती ती योग्य प्रशिक्षणाची. पाल यांनी गिर्यारोहक होण्यासाठी आवश्‍यक असणारे सर्व प्रशिक्षण पूर्ण केले. 1984 साली भारत सरकारच्या पहिल्याच महिला आणि पुरूष या संयुक्त एव्हरेस्ट अभियानासाठी त्यांची निवड झाली. आजपर्यंतच्या संघर्षपूर्ण प्रवासातील अंतिम टप्पा पार करणे, हेच ध्येय समोर ठेऊन पाल यांचा एव्हरेस्टचा प्रवास सुरू झाला. अचानकपणे हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे काहींना बेस कॅम्पला परत यावे लागले. मात्र, पाल यांनी काहीही झाले, कितीही निसर्ग समोर उभा राहिला तरी त्यावर मात करून एव्हरेस्ट सर करायचे, हे मनोमन ठरविले होते. उणे चाळीस तापमान, ताशी शंभर किमी वेगाने वाहणारे थंड वारे तसेच होणारा प्रचंड हिमवर्षाव या सगळ्यांवर मात करीत पाल यांनी अखेर सागरमाथा गाठला. तिथे त्या ऐतिहासिक क्षणाचा भाग होत त्यांनी तिरंगा ध्वज फडकावून आपले एव्हरेस्टचे स्वप्न पूर्ण केले.

आज बचेंद्री पाल टाटा स्टील यांच्या माध्यमातून महिलांना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देतात. या संस्थेच्या मदतीने अरुणिमा सिन्हा यांच्यासारखे असंख्य खेळाडू एव्हरेस्ट सर करू शकले. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी पाल यांच्या चाळीस लोकांच्या टीमने चाळीस हजार किलो कचरा गोळा करून आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. Everest my journey to the Top ho त्यांचे पुस्तक आज असंख्य गिर्यारोहकांना प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहे.

महिला सक्षम झाल्या पाहिजेत त्यांनी चुकीच्या परंपरांना विरोध करीत, सकारात्मक राहात आपल्या आयुष्याचा मार्ग सुखकर केला पाहिजे, असे सांगत पाल या आज एक प्रेरकशक्ती म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना अर्जुन, पद्मश्री आणि आता पद्मभूषण पुरस्कार दिला आहे. अशा या प्रेरणादायी हिमालय कन्येला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.

– श्रीकांत येरूळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)