हिंजवडी गावठाणातून आयटी बस वाहतुकीला विरोध

पिंपरी – हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकापासून आयटी पार्क फेज 1, फेज 2, फेज 3 पर्यंत रस्ता आणि हिंजवडी गावठाणामध्ये आयटी पार्क कंपनीच्या वाहनांची वाहतूक करण्यास वंदे मातरम्‌ शेतकरी विकास संघटनेने विरोध दर्शवला आहे. ही भुमकर चौकातून लक्ष्मी चौक मार्गे वळविण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देण्यात आला.

यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पायगुडे यांनी हिंजवडीच्या वाहतूक पोलीस नियंत्रक शाखेला निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्या चौकामध्ये गणपती मंदिर आहे. त्या मंदिराकडे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच हिंजवडी चौकातून मारुंजी, दत्तवाडी, कासारसाई ते चांदखेडपर्यंतच्या ग्रामीण भागापर्यंत ऑटो रिक्षा बेसुमार प्रवासी घेवून वाहतूक करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्याकडून पिंपरी-चिंचवडकडे आणि पिंपरी-चिंचवडकडून पुण्याकडे जाणाऱ्या पीएमपी बसेस दर अर्ध्या तासाला आहेत. त्यासाठी प्रवासी छत्रपती चौकातील गणपती मंदिरा समोर थांबतात. परंतु, भाजीपाला विक्रेते आणि ऑटो रिक्षा भर चौकाचौकात चारही बाजूला पीएमपी बसस्टॉप जवळ थांबतात. त्यामुळे रस्त्यावरील अडथळ्यामुळे बसेस आणि इतर वाहनांना एक एक तास थांबावे लागते. यावर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

हिंजवडीतील छत्रपती चौक येथील ऑटो रिक्षा, भाजी, फळ विक्रेते आणि इतर व्यावसायिक मारुंजी रस्त्याच्या डाव्या बाजूला बसविण्यात यावे. त्यामुळे हा रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत राहिल. तसेच, पुण्याकडून होणारी वाहतूक वाकड पुलावरून आणि हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकापासून आयटी पार्क फेज 1, फेज 2, फेज 3 पर्यंत रस्त्यावरची होणारी वाहतूक भूमकर चौकातून लक्ष्मी चौक मार्गे वळविण्यात यावी, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)