हावभावांवरून मन अोळखा 

सुरेश परुळेकर  

Mind and Gestures ‘Gestures’ means movements to carry meaning. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कल्पना, भावना इत्यादी व्यक्त करण्यासाठी लहानापासून वृद्धापर्यंत माणूस हावभाव किंवा हातवारे करतो. त्यांनाच “जेश्‍चरस’ gestures म्हणतात. उदाहरणार्थ “”ए जेश्‍वर ऑफ रिफ्यूझल” नकार दर्शविणारा हावभाव (किंवा देहबोली), लहान बाळाची आई असाच हावभाव करून त्याला झोपविते. लहानपणी “बागुलबुवा’ असतो. आता “लता’ मोठी झाली. पण वर्षाची असताना तिची आई “नम्रता’ बागुलबुवाचाच धाक तिला दाखवत असे. मी हे नाटक दररोज बघायचो. लताला पांघरुणात “गुडुप्प’ केलेले असे. काजळ घातलेले टप्पोरे डोळे, ती अजून मोठ्ठे करायची व नम्रता तिच्या कपाळावर, अंगावर थोपटत म्हणायची- “”बागुलबुवा आला. लवकर डोळे मीट नाहीतर तुला पोत्यात टाकून घेऊन जाईल.” अर्थात, लताला काय त्या वाक्‍याचा अर्थ कळत होता? शेवटी “”झोपली एकदाची” हा सुटकेचा उद्‌गार नम्रताच्या देहबोलीतून चक्क दिसत असे. हसत-खेळत बाळ निजले, म्हणजे मिळवली.

हावभावांची कला जमल्याशिवाय, दुसऱ्यांशी जमवून घेता येणार नाही. स्वतःचा दुसऱ्यांना उपसर्ग होता कामा नये. “कोण काय म्हणले?’ हा समाजाचा सोटा नसता तर व्यक्ती सुधारूच शकली नसती. हावभाव आणि हातवारे बरंच काही सांगून जातात.

बऱ्याच वेळी, मनुष्याची पारख, त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून केली जाते. “हावभाव’ (जेश्‍चर्स) ही एक प्रकारची गूढ भाषा आहे. कधी कधी, शब्दांना अधिक संयमित करून, आपण आपले विचार हावभावांनीच व्यक्त करतो. तिकेच काय, पण एखाद्या विषयीचे मत म्हणजे त्याच्या हावभावांशी घडणाऱ्या, आपल्या शीघ्र प्रतिक्रियांचे ते स्वरूप असते.
मानसशास्त्रज्ञ एफ. एच. आल्पर्टने
(F.H. Allport) हावभावांचे पुढील प्रकार सांगितले आहेत.
1. भावनिक– सुखात्मक किंवा दुःखात्मक अवस्था. उदाहरणार्थ- पाठीवर थाप देऊन किंवा कपाळावर हात मारून, त्या व्यक्त होतात.
2. प्रदर्शक– वस्तू किंवा व्यक्तीसंबंधी संकेत करण्यासाठी केलेले हावभाव.
3. प्रतिकात्मक – उदा. भारतीय नृत्यातून केवळ बोटांच्याच, कमीत कमी प्रतिकात्मक हालचाली आहेत. त्यातून निरनिराळे अर्थ सूचित होतात.
4. सवयीचे हावभाव– एखादा नेपोलियनसारखा, पाठीमागे हातात हात अडकवून, पायात अंतर ठेवून उभा राहतो.
काही माणसे दोन्ही हातांच्या बोटांची टोके, एकमेकांवर ठेवून बोलतात, काहींना कमरेवर हात ठेवून उभे राहण्याची सवय असते, अशा वैयक्तिक लकबी सणाऱ्या व्यक्तींचा चांगला परिचय झाला, की त्यांना स्फूर्तिमूल्य प्राप्त होते. अशा व्यक्तींशी जमवून घेण्याकरिता एकच मार्ग असतो व त म्हणजे त्यांचे कौतुक करण्याचा. हावभावांकडे लक्षदेऊन, स्वतःला सावरून घ्यावं लागतं.

एकमेकांना स्तुती चालू झाली की वातावरम हास्यमय होतेच. “”अहो रुपम, अहो ध्वनि” ची कथा तुम्हाला माहीतच असेल. थोडक्‍यात सांगतो. रस्त्यात भेटलेल्या उंटाकडे पाहून गाढव म्हणाले, “”वा! देवाने तुम्हाला वेगळेच सौंदर्य बहाल केले आहे.” हे ऐकून खूश होऊन उंट म्हणतो, “”तुझा आवाज कोणीही ओळखेल. अगदी गर्दभराज शोभतोस!”
नृत्य आणि सौंदर्यात्मक इतर क्रियांच्या द्वारा चेहऱ्यावरील आविर्भावाचे चेतकमूल्य स्पष्ट होते. अशा कलांची उपासना करणाऱ्यांना चेहऱ्यावरील अभिव्यक्तिकरणाची कला शिकावी लागते.

चेहऱ्यावरून लक्षात येणाऱ्या, पसंती-नापसंतीच्या सूक्ष्म हालचालींना अनुसरून, दुसरा बोलणारा, आपल्या बोलण्याच्या शब्दांत फरक करीत असतो. चेहऱ्यावरील आविर्भावांत डोळ्याच्या हालचालींना फार महत्त्व असते. एखाद्या परिस्थितीवर वयक्तीचे पूर्ण नियंत्रण आहे की नाही, हे त्याच्या डोळ्यांवरून चटकन समजते.
एखाद्या गोष्टीला लाजणारा किंवा घाबरणारा मनुष्य आपले डोके खाली वळवितो, आणि दुसऱ्याच्या नजरेला नजर देत नाही. वरचढ वृत्तीच्या मनुष्याचे डोळे स्थिर राहतातत. उलट, कमकुवत वृत्ती निर्माण झाली, की डोळ्यांच्या हालचाली जास्त होतात.

समाजाशी जमवून घेणारी व्यक्ती, स्वतः आतून खूष असते किंवा तसे व्हावेच लागते. याकरिता शरीराची ठेवण फार महत्त्वाची. शरीराच्या ठेवणीवरून, मनुष्याचे स्नायू एखाद्या क्रियेसाठी तत्पर आहेत किंवा नाहीत, याचा बोध होतो आणि स्नायूंच्या तत्परतेचा इतरांवर परिणाम होतो. ही तत्परता उत्साह व दृढतादर्शक असते. ती इतरांना प्रतिक्रिया करावयास भाग पाडते.
जमवून घेण्याकरिता हावभावतंत्र आत्मसात केलंच पाहिजे.
मोजकेच बोलणे, थोडकेच हसणे व सर्वकाही हळूहळू करणे या तीन गोष्टी हावभावात दिसल्याच पाहिजेत. रिलॅक्‍सेशन (Relaxation) फार महत्त्वाचे.

मानसशास्त्रज्ञ एफ. एच. आल्पर्टच्या मते :
“”बोलण्याचा मूळ उद्देश, इतरांकडून कोमती तरी प्रतिक्रिया घडवून आणणे, हा असतो. स्वतःच्या कोणत्या तरी इच्छापूर्तीसाठी तो बोलत असतो.”
चेतक-प्रतिक्रिया म्हणजे एकमेकांशी वर्तन, हास्य हा सामाजिक चेतक आहे; तसेच सामाजिक प्रतिक्रिया देखील आहे. हास्यामुळे मित्रभाव व समानतेचा भाव दृढ होतो. मुख्य काय तर हावभाव-जेश्‍चर्स, अभिनय वगैरे जिवंतपणाची लक्षणे आहेत. हावभाव संपला म्हणजे हालचालच संपली, खेळच संपला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)