हवेत गोळीबार करणारा माजी नगरसेवक अटकेत

साताऱ्यामध्ये खळबळ, आणखी एक संशयिताला अटक

सातारा, दि. 21 (प्रतिनिधी)

येथील गजबजलेल्या पारंगे चौकाजवळ किरकोळ कारणावरून एका माजी नगरसेवकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. सुमारे साडेसातच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे साताऱ्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

त्यानंतर गोळीबार करणाऱ्या माजी नगरसेवक महेश जगताप याला अटक केली आहे. त्याचा साथीदार गोळे (पूर्ण नाव समजले नाही) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, पारंगे चौकातील एका इमारतीत असणाऱ्या दोन व्यावसायिकांच्यामध्ये पार्किंगवरून वाद होत होता. त्यातील एका व्यावसायिकाने याची माहिती महेश जगताप यांना दिल्यानंतर त्याने पारंगे चौकाजवळ जगतापच्या घरासमोर हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे घटनास्थळी दाखल झाले होते. संशयित पळून जाऊ नयेत, म्हणून पोलिसांनी पारंगे चौकातून बाहेर जाणारे सर्व रस्ते बंद करून घटनास्थळावरून माहिती घेतली.

त्यानंतर संशयित जगताप याला त्याच्या घरातूनच पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, सातारा बस स्थानकाकडून जिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पारंगे चौकाजवळ ही घटना घडल्यामुळे खळबळ माजली. रस्त्यावरून नेहमी मोठी रहदारी असते. घटना घडल्यानंतर अनेक मान्यवरांसह अनेकांनी परिसरात गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.