हवाई दलाचे सुखोई विमान अपघातग्रस्त : कोणतीही जीवतहानी नाही

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान सुखोई गुरूवारी रात्री अपघातग्रस्त झाल्याची घटना समोर आली आहे. आसाममधील तेजपूर जवळ ही घटना घडली. दरम्यान, दोन्ही वैमानिक विमातून सुखरूप बाहेर पडले असून ते सुरक्षित आहेत. त्यांच्यापैकी एका वैमानिकाच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी दिली.

सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत होते. परंतु रात्री साडेआठच्या सुमारास हे विमान अपघातग्रस्त झाले आणि एका शेतात पडले. त्यानंतर त्या विमानात आग लागल्याचे पांडे यांनी सांगितले. तसेच या दुर्घटनेत सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले नाही. दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी दोन्ही वैमानिकांना नजिकच्या सैन्याच्या रूग्णालयात दाखल केले असल्याचे ते म्हणाले. या घटनेनंतर अग्नीशमन दलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.