#हलके-फुलके: “रिकाम्या खिशाची श्रीमंती’ 

विलास पंढरी 
मी पक्का देशस्थ. गबाळा, विसराळू आणि पसारा करण्यात एक्‍सपर्ट. निवांत उठणार. पेपर वाजताना किती वेळ गेलाय याचं बहुधा भान नसतं. मग गडबडीत आंघोळ उरकणार, जमलीच तर पूजा करणार. याउलट बायको. ती कोकणस्थ. कितीही कामे असू देत, ती करूनही तिच्याकडे वेळ उरतोच. एखादं सोपवलेलं काम रोज मी करेनच अशी खात्री नसल्याने तिचे टोमणे निमूटपणे ऐकून घ्यावेच लागतात.
रोज ऑफिसला जाताना बहुधा काही तरी विसरतोच. असाच एके दिवशी ऑफीसला निघालो. “”किल्ली, रूमाल , लॅपटॉप, टिफीन. रेनकोट, चष्मा सगळं घेतलंय?’ बायकोने विचारलं. “हो हो सगळं घेतलंय” मी. जाताना बायकोने हसत हसत बाय केलं. दिवसाची सुरुवात तर छान झालेली.
गाडी सुरू केली. पेट्रोलच्या काट्यानं मान टाकलेली दिसली. पंप जवळच असल्याने टेन्शन नव्हतं. गाडी पंपावर. “फुल करू का साहेब?” ” बरं कर फुल” मी. त्यानं गाडीच्या टाकीत पेट्रोल ओतायला सुरुवात केली. मी पॅंटच्या खिशात हात घातला. पाहातोय तर खिसा रिकामा. बापरे, पाकीट विसरलो. वरच्या खिशात हात घातला. तोही रिकामा. एटीएम कार्डही पाकिटातच असायचं. मोबाईलही विसरलो. माझा चेहरा खर्रकन उतरला. आजूबाजूला कुणीही ओळखीचं दिसेना. प्रचंड लाज वाटायला लागली. तसा हा पंप ओळखीचा. गेली वीस वर्ष इथंच पेट्रोल भरतोय. बहुतेक कामगार ओळखीचे, पण हे एकतर्फी प्रेमासारखं. आता हे ओळख देतील, याची गॅरंटी वाटत नव्हती.
निराश मनस्थितीत निर्णय घेतला. ठरलं, गाडी इथंच लावायची. इथं रिक्षाही मिळत नाही. जाऊया दीड किलोमीटर चालत. घरून फोन आणि पैसे घेऊ. बायको सोडेल इथपर्यंत. प्रॉब्लेम एकच होता. पंधरा मिनिटांत क्‍लायंट ऑफिसला पोहचणार होता. मी पोहचलो नाही, तर बॉस पेट्रोलशिवाय पेटला असता. माझं टेन्शन माझ्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. पंपावरचा माणूस खुदकन्‌ हसला. “होतं साहेब असं कधी कधी. उद्या द्या पैसे.” माझ्या जिवात जीव आला. मी मनापासून त्याला थॅंक्‍स म्हटलं. “रोज दुनिया बघतो इथं पंपावर. पैशाचं टेन्शन घेऊ नका. या तीनशे रुपयापाई अख्खा दिवस खराब नका करू. मला माहिती आहे, आज तुम्हालाच झोप यायची नाही. निवांत ऱ्हावा. ” मी पुन्हा त्याला दिलसे थॅंक्‍स म्हट्‌ले.ं. ऑफिस गाठलं. मी पोहचलो अन्‌ पाचच मिनिटांत क्‍लायंट आला. दीड तास त्याच्याच सेवेत. तो पटला. मोठ्ठी ऑर्डर मिळाली. बॉसही एकदम खुश झाला. त्याने 20% पगार वाढ जाहीर करून टाकली.
“चलो, चाय हो जाए..” मी. “तू घेऊन ये” बॉस. ऑफिसच्या खाली सद्रुची टपरी. ऑफिसपेक्षा मला त्याच्याकडचा चहा आवडतो. मन प्रसन्न करणारे किंवा मूड जाणारं काही घडलं की मी तिथला चहा घेतो. मी जिना ऊतरून खाली आलो. मस्त अद्रकवाली चाय. गरम गरम घोट पीत होतो. खिशात हात घातला. आपण पाकीट विसरलो, हेही विसरलो.. सद्रूनं माझा चेहरा वाचला. सद्रूला काही म्हणणार….एवढ्यात त्यानंच माझ्या खिशात पाचशेच्या दोन नोटा कोंबल्या. “काय बी बोलू नका साहेब. रोजच्या गडबडीत विसरतं माणूस. अजून लागले तर सांगा. तुमास्नी ऑफिसमधी कुणीबी दिले आस्ते. पर तुमी कुणाला पैसे मागावे, मला नस्तं आवडलं. उद्या देतो, म्हणून मला लाजवू नका. जावा बिगीबिगी.साहेब कावतील तुमचं.” मी चिडीचूप्प. हलक्‍या पावलानं ऑफिसला परतलो. आता वरच्या खिशाला हजार रुपयांची ऊब होती. त्या हजार रुपयांनी मी अनिल अंबानीहून श्रीमंत झालेलो होतो. दीड वाजत आला होता. वेळ कसा गेला कळलं नाही. लंच टाईम झाला. एवढ्यात बायको ऑफिसात हजर. घामाघूम झालेली. “तुम्हाला नाही, मलाच काळजी. पाकीट, फोन सगळंच विसरलात.
तसं तुमचं पैशावाचून काही अडणार नाही म्हणा. सगळी तुमचीच माणसं आहेत आजूबाजूला. पण मला खूप लागलं असतं. शक्‍यतो मागायची वेळ येऊ नये, आपल्या माणसावर. घ्या तुमची इस्टेट. शंभर फोन येऊन गेलेत त्याच्यावर. अन्‌ तुमच्या त्या बचपन की सहेलीचासुद्धा! गेट टुगेदर आहे म्हणे तुमच्या 2000 च्या बॅचचं .. निस्तरा काय ते. मी चालले..” बायको वाऱ्याच्या वेगाने गायब. पाकीट खिशात ठेवलं. बायकोच्या प्रेमाने अगदी गहिंवरून गेलो. बायकोशी भांडतानाचा माझा कठोरपणा आठवून माझी मलाच लाज वाटली. आता तर मी भलताच श्रीमंत झालेलो. लंचटाईमनंतर बॉसच्या केबिनमधे जाण्यासाठी आलो. केबिनमधे शिरणार तेवढ्यात कानावर काही पडलं. बॉस बायकोशी बोलत होता.
“डार्लिंग तुझा ड्रेस आणला असता गं नक्की..आज नेमकं वॅलेट विसरलोय. आणि स्टाफकडून पैसे घेणं तुला आवडणार नाही. तुला दिसलं नाही का घरी..? उद्या नक्की.प्लीज..रागवू नकोस.’ मी केबिनबाहेर वेळ काढला. दोन मिनिटात फोनवरचं बोलणं संपलं. दारावर नॉक करून आत गेलो. पाकिटातल्या पाचशेच्या नोटा बॉसच्या हातात कोंबल्या. ” सॉरी ,मी तुमचं संभाषण ऐकलं.थॅंक्‍स म्हणू नका सर..’ पटकन्‌ मागे फिरलो. बॉसच्या चेहऱ्यावरचा सुटकेचा आनंद मी पाठीवरल्या डोळ्यांनी डोळे भरून बघितला. माझं पाकीट पुन्हा रिकामं झालं. तरीही मी डबलश्रीमंत. श्रीमंतीचा माज करावा, तो पाकीट रिकामं असतानाच. भरल्या पाकिटात ती मजा नाही. तरीही पाकीट संभालो रे बाबा; भूलना नही!
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)