#हलके फुलके: परतफेड   

file photo
सुजाता निंबाळकर 
स्वारगेट-महाड बस एसटी स्थानकावर उभी राहिली आणि एकच झुंड बसवर पडली. कोणी ड्रायव्हरच्या केबिनमधून जागा धरण्यासाठी धावला, तर कोणी मागच्या सीटच्या एमर्जन्सीमधून आत घुसू लागला. काहींनी तर छोटी मुले खिडकीमधून आत टाकली. एसटी बसला जणू जत्रेचं स्वरूप आले. काही लोक गाडीत चढत होते कोणाची एक चप्पल आत, तर एक बाहेर असे चित्र दिसत होते. कशीबसी सर्व कोंबाकोंबी झाली. कंडक्‍टर वाबळे आले त्यांनी टणकन बेल वाजवली आणि एसटीने महाडचा रस्ता धरला.
भली मोठी जाडजूड शरीरयष्टी, गोरा वर्ण, गंभीर चेहरा असलेले, खणखणीत आवाज असल्यामुळे एसटीतील प्रवाशांचे सहजच लक्ष वाबळ्यांच्याकडे जात होते.
“”चला तिकीट…. तिकीट…. सुटे पैसे द्या.” असे मोठ्या दरडावलेल्या आवाजामुळे हातात नोटवाल्यांची दमछाक झाली होती. वाबळे शेजारी आले की लोक बिनबोभाट चिल्लर देऊन तिकीट घेत होती. वाबळे पुढे आले आणि एका थरथरणाऱ्या हातात 100 रु.ची नोट दिसली. तसेच वाबळे गरजले.
“”माझ्या घरी काय चिल्लरीची कंपनी आहे का? सकाळी सकाळी 100 रु. ची नोट काढली. कुठं जायचंय?” वाबळेनी दरडावले, तशी म्हातारी व्यक्ती गडबडली.
“”मला भोरला जायचंय. भोरमध्ये गेल्यावर उरलेले पैसे द्या.” एवढे बोलून त्या गर्दीच्या रेट्यातच पुढे उभी राहिली. गाडीतील एका गृहस्थाने त्या म्हाताऱ्या व्यक्तीला कंडक्‍टर सीटवर बसण्यास सांगितले. कंडक्‍टर साहेबांनी तिकीट फाडून म्हाताऱ्याच्या हातात दिले आणि ते काही आठवल्यासारखे करू लागले. ते आपल्या बुद्धीला ताण देत आहेत हे इतरांच्या नजरेतून चुकले नाही. कंटक्‍टरचे बुकिंग करून झाले आणि ते आपल्या जागेवर आले.
“”ओ बाबा सरका पलीकडे… नाही तर उठून उभा राहा.”
कंडक्‍टरच्या आवाजाने म्हातारी व्यक्ती उठून उभी राहिली. थोड्या वेळाने कंडक्‍टर मुद्दाम उठला व मागे गेला. तेवढ्यात बाबा पुन्हा सीटवर बसले. कंडक्‍टर परत आला आणि म्हाताऱ्याला ओरडला.””उठा बाबा… इथंच काय मधाचं पोळं चिकटलं का? सारखं इथंच चिकटताय ते. माझा सासरा असल्यासारखा हक्कानं बसताय इथं.” असं चारपच वेळा झालं. आता म्हातारा चिडून म्हणाला-
“”अरे मी म्हातारा माणूस. जागा काय कुणाच्याच मालकीची नाही.”
“”कुणाच्याच मालकीची नाही म्हणजे… मी या गाडीचा कंडक्‍टर. या जागेवर आता तरी माझीच मालकी आहे.” कंडक्‍टरने आपला हक्क ठणकावून सांगितला.
बाबादेखील चांगलेच भडकले.
“”मीदेखील मघापासून तुमची गंमत बघतो. मी बसलो रे बसलो, की अर्ध बुकींग सोडून येता. बसल्यागत करताय. मला उठवताय व परत जाताय. काय म्हणावं या संस्काराला. तुमच्या घरी काय म्हातारी माणसं आहेत की नाहीत.”
कंडक्‍टर पुन्हा गप्प झाले आणि पुढच्या स्टॉपवर लोक उतरले की उभ्या राहिलेल्या लोकांच्यामधील कोणाला तरी पटकन बसायला सांगत होते. ओरडल्यामुळे लोक त्यांच्या आज्ञेचं पालनही करीत होते. पण वाबळे कंडक्‍टर त्या म्हाताऱ्याला काय बसण्यास जागा देत नव्हते. हे त्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या देखील लक्षात आले की हा माणूस जाणून-बुजून आपणाला त्रास देतोय. कंडक्‍टरच्या शेजारील सीट मोकळं झालं. कंडक्‍टरने चटकन एका धट्याकट्या माणसाला बसावयास सांगितले. आता म्हातारा चांगलाच चिडला.
“”कंडक्‍टर तुम्ही म्हाताऱ्या माणसावर अन्याय करताय. त्याच्या भावना समजावून घ्या. हा तुम्ही न्याय करीत नाही, तर अन्याय करताय माझ्यावर.”
“”अन्याय नाहीजी तुमच्याबरोबर न्यायच करतोय मी. कारण मी तुमच्या वर्गात होतो तेव्हा तुम्ही मला कधी खाली बसू दिलं नाही. सारखं उभं राहण्याची शिक्षा. अजूनही मला तीच शिक्षा. आता माझ्या हातात अधिकार आल्यावर मी देखील तुम्हाला त्याची परतफेड दिली आहे.”म्हातारा कंडक्‍टरचा चेहरा न्याहाळू लागला. ओळख पटताच तो मोठ्यांन म्हणाला,
“”तू तो टारगट मुलगा राजा वाबळेच ना.”
आपल्याला गुरुजींनी चटकन ओळखलं याचा आनंद कंडक्‍टरला झाला आणि कंडक्‍टर राजाने स्वतः उठून अदबीने म्हाताऱ्याला त्या ठिकाणी जागा दिली. आपला जुना टारगट विद्यार्थी अजूनही तसाच खोडकर आहे, हे गुरुजींनी ओळखले. ते त्याच्या सीटवर बसले. आता त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसत होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)