हद्दीलगतचा कचरा पुण्याच्या उंबऱ्यावर!

प्रकार वाढले 


संबंधित ग्रामपंचायतींची यंत्रणा अपुरी

पुणे- शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न सध्या पेटला आहे. केवळ कचरा प्रकल्पावरच हजारो कोटी रुपये महापालिका खर्च करत आहे; असे असताना हद्दीलगतच्या गावांचा महापालिका हद्दीत कचरा टाकण्याचा प्रकार अधिकच वाढलेला दिसून येत आहे. महापालिकेचा अंकुश नाही आणि ग्रामपंचायत कचरा विल्हेवाटीची सोय करत नसल्याने त्याचा मनस्ताप हद्दीजवळ राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

संबंधित भागातील क्षेत्रीय आयुक्त आणि झोनल कमिशनर यांना याविषयी सूचना दिल्या आहेत. त्यांच्या अखत्यारित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रोज अशा ठिकाणी व्हिजिट करणे आवश्‍यक आहे. मात्र त्याबाबत उदासीनता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊ. ज्या ठिकाणी कचरा आणून टाकला जातो तेथे मनुष्यवस्ती नाही. अशाच मोकळ्या जागेत कचरा आणून टाकण्याचे प्रकार घडत आहे. तरीही तेथील कचरा महापालिका उचलते.
– सुरेश जगताप, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख, मनपा.

महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावांमधील कचरा उचलण्याला महापालिकेने सुरूवात केली आहे. परंतु हद्दीत समाविष्ट न झालेली परंतु हद्दीलगत असलेल्या गावांनी सर्रास महापालिका हद्दीत कचरा टाकण्याला सुरूवात केली आहे. वास्तविक या गावातील ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावातून निर्माण होणारा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सोय करणे बंधनकारक आहे. परंतु यातील बहुतांश गावांमध्ये ती व्यवस्था केली नाही किंवा ते करण्याला असमर्थ आहेत. त्यामुळे त्यांनी सोपा उपाय म्हणून महापालिका हद्दीत रात्री किंवा पहाटेच्यावेळी कचरा टाकण्याला सुरूवात केली आहे.

दंड आकारण्याची घोषणा पोकळ
खडकवासल्याजवळील किरकिटवाडी, बावधन, मांजरी, नगर रस्त्यावरील गावे, हांडेवाडी, नऱ्हे, भूगाव, बालेवाडी, म्हाळुंगे यांचाही यामध्ये समावेश आहे. या विषयावर महापालिका मुख्यसभेत चर्चाही झाली आहे. कचरा टाकताना आढळल्यास या गावांकडून दंड वसूल केला जाईल, असे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रमुखांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.

प्रक्रिया प्रकल्प घोषणेपुरताच
“राष्ट्रीय स्वच्छता मिशन’चा मूळ हेतू लक्षात घेतला तर घरोघरी जाऊन कचरा उचलणे तसेच शक्‍य झाल्यास आपल्याच गावामध्ये आवश्‍यकतेप्रमाणे कचरा प्रक्रिया प्रकल्प तयार करणे आवश्‍यक आहे. परंतु एकाही गावामध्ये अशी सोय करण्यात आली नाही. तसे करण्याला अनेक ग्रामपंचायतींनी असमर्थता दर्शवली आहे. प्रकल्प करण्यापेक्षा महापालिका हद्दीत चोरून कचरा टाकणे त्यांना जास्त सोपे वाटते.

आरोग्याला धोका आणि कचऱ्याची ‘भिंगरी’
या गावांना जोडणारी जी महापालिका हद्द आहे, तेथे हे कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी आहेत. उन्हाळा असल्याने वारे सुटते. यामुळे या कचऱ्याची अक्षरक्ष: भिंगरी (वावटळ) होऊन हा कचरा उंच हवेत उडतो. वाहनचालक, पादचारी यांच्या अंगावर हा कचरा उडून येत असल्याचा प्रकार गेल्या काही दिवसापासून वारजे नाका भागात दिसून येत आहे.

नांदेड सिटी पासून “केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्थे’च्या (सीडब्ल्यूपीआरएस) जवळच असलेला किरकिटवाडीपर्यंतचा 1 किमी परिसरात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. हा भाग महापालिका हद्दीत येत नाही. परंतु तेथून शहरामध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तेथील गावांनी याबाबत काळजी घेणे आवश्‍यक आहे. मात्र प्रत्यक्षात त्याविषयी येथील ग्रामपंचायतीकडून काहीच केले जात नसल्याचे दिसून येते.

कर्मचारी भवनात; कचरा मैदानात
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांचा कचरा महापालिकेकडून उचलला जातो. परंतु जी गावे समाविष्ट नाहीत आणि महापालिका हद्दीत ते कचरा टाकतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात नाही. घनकचरा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ आहे, जागेवर ठाण मांडून उभे राहण्यासाठी सॅनिटरी इन्स्पेक्‍टर देखील आहेत. परंतु हे कर्मचारी महापालिका भवनातच बसून राहतात. नेमून दिलेल्या हद्दीत जाऊन पाहणी करण्याची ते तसदीही घेत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच त्यांनी पाहणी केली का, याचे मूल्यांकनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केले जात नसल्याची शोकांतिका आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)