हजारो बी.एड., डी.एड. उमेदवारांना दिलासा

पुणे – राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या नियमित नियुक्‍त्या होईपर्यंत पदवीधारक (बी.एड.) व पदविकाधारक (डी.एड.) अंशकालीन उमेदवारांना तासिका तत्वावर किंवा करार पद्धतीने शाळांमध्ये नोकरी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यास शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून मान्यताही मिळाली आहे.

पदवीधर अंशकालीन उमेदवारांचा गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्‍न निकाली काढण्यासाठी व अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्वावर नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याकरीता कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाने शासन निर्णयाप्रमाणे एक समिती गठीत केली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार यापूर्वीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या शाळांमध्ये संच मान्यतेपेक्षा शिक्षकांची पदे कमी असल्यास अथवा अन्य कारणाने संचमान्यतेच्या संख्याप्रमाणे शिक्षक उपलब्ध न झाल्यास त्या शैक्षणिक वर्षासाठी रिक्त पदावर आवश्‍यकेनुसार शैक्षणिक अहर्ता धारण करीत असलेल्या अंशकालीन उमेदवारांना शिक्षण सेवकांप्रमाणे नियुक्‍त्या देण्यात याव्यात. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिनियमानुसार नियुक्ती अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. नियुक्‍त्या देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अंशकालीन उमेदवारांची यादी त्यांच्या जिल्ह्याच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालकांकडून प्राप्त करुन घेणे आवश्‍यक आहे. उमेदवारांचा वैयक्तिक तपशील तपासूनच त्यांच्या नियुक्‍त्या देण्यात याव्यात, असे आदेश ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजाविले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.