हक्क आणि कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू

भारतीय संविधानाने प्रत्येकाला मुलभूत हक्क आणि कर्तव्ये दिली आहेत. या महत्वाच्या विषयाची सर्वसामन्यांना कितपत माहिती आणि जाणीव आहे याबाबत प्रभातने साधलेला संवाद.

शिक्षणाचा दर्जा उंचावणे गरजेचे

प्रत्येक नागरिकांला शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे. केंद्र शासनाकडून दर्जेदार शिक्षणाची गंगा वाहत असताना ती शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नसल्याचे वास्तव आहे. शिक्षणामध्ये बाजारीकरण आल्याने सर्वसामान्य नागरिकांना जातीनिहाय आरक्षणाच्या कुबड्यांचा वापर करूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी होत असलेले प्रयत्न पादर्शक आहेत का असा प्रश्‍न आहे. याबाबत प्रयत्न करताना आज देखील लढावे लागत आहेत. चांगल्या दर्जाच्या शिक्षणासाठी शाळांची, शिक्षकांची उपयोगिता व त्यासाठी समाजातील सर्व घटकांना सामावून त्यांना शिक्षणाचा आधिकार मिळवून देण्यासाठी प्रामाणीक प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासकिय शिक्षण संस्थांची अवस्था चांगली नाही. यामध्ये दर्जेदार शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळत नाही. इंग्रजी माध्यमांचे वाढते प्रस्त आणि भरमसाठ फि यामध्ये शासकिय शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची नितांत गरज आहे.
विजय कदम

सोशल मीडियाचा विधायक वापर गरजेचा

सध्याच्या आधुनिकीकरणाच्या युगात मोबाईल क्रांती आणि इंटरनेटचा मोठया प्रमाणावर सुरू असलेला वापर यामुळे जग जवळ आले.मात्र माणसे दुरावल्याचे चित्र दिसत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून संदेशांची देवाण घेवाण करताना अनेक वेळा सुसंवादापेक्षा विसंवादच जास्त होत आहे.अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा सोशली वापर करताना शासकिय पातळीवर निर्बंध म्हणजे आपल्या हक्कावर गदा असे समजू नये. सामाजीक भान, जातीपातीमध्ये तेढ निर्माण होईल महिलांना लज्जा उत्पन्न होईल अथवा राष्ट्रपुरूषांचा अवमान होणार नाही असे मेजेज किंवा पोस्ट व्हायरल करू नये. मोबाईलमधील सोशल मिडीयामुळे एक चुकीचा मेसेज युध्द घडवू शकतो किंवा सामाजीक तेढ निर्माण करू शकतो. त्यामुळे आपल्या सोशल व्यक्त होण्यामध्ये काही हक्कांची व आपल्या कर्तव्याचे भान ठेवुनच आपण सोशल मिडीया हाताळणे आवश्‍यक आहे.
महेश सोनावणे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घटनेचे आदर्श पालन गरजेचे

घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श जपण्यासोबत, राष्ट्रध्वज, व राष्ट्रगीत यांचा आदर देखील करणे आवश्‍यक आहे. ज्या प्रतिकांमुळे राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फुर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासणा करण्यासोबतच. भारताचे सार्वभौमत्व व एकता, एकात्मता उन्नत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. आपल्या देशाचे संरक्षण करताना धार्मिक भाषिक व प्रादेशीक वर्गीय भेदापलीकडे जावून भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य बंधुता या मुल्यांची जोपासना करण्याची शिकवण देणे आवश्‍यक बनले आहे. आज प्रत्येक जण आपल्याच झेंड्याचे महत्व सिध्द करताना भारतीय अस्मिता तर हरवत नाही ना याबद्दल चिंता वाटते आहे. पर्यावरण, राष्ट्राची संपत्ती, आणि देशाची उन्नती यासाठी विकासात्मक बदलांना स्विकारताना घटनेचा आदर्श अवलंब दैनंदिन आयुष्यात देखील महत्वाचा आहे.
सागर आवळे

महिलांचा सन्मान करणे गरजेचे

स्त्री पुरूष समानता हा परवलीचा शब्द बनला आहे. खरं तर महिलांना स्वतंत्र आरक्षण मिळाले आहे. मात्र आज देखील महिला असल्याकारणाने अनेक ठिकाणी साधा प्रवेश देण्यावर सुघ्दा वादाचे प्रकार घडत आहेत. पुरूषाच्या खांद्याला खांदा लावुन काम करणाऱ्या महिलांना आज समाजात मिळणारी अवमानकारक वागणूक थांबली का हा प्रश्‍न आहे. महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनामध्ये आज पर्यंत महिलांच्या वागण्या बोलण्यावर आणि फिरण्याव निर्बंध घातले जातात. याला काही अपवाद वगळता आज अनेक ठिकाणी अनेक पिडीता न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. कुटुंबव्यवस्थेपासुन देशाच्या कारभाराला सांभाळत राजकारण करणाऱ्या अनेक महिलांना महिला म्हणून मिळणारी वागणूक पहाता समानता रूजवण्यासाठी प्रत्येकांने आपल्या घरापासून आतापासुन सुरूवात करणे आवश्‍यक आहे.
प्रा. संध्याराणी माने. सातारा

जल हे तो कल है

माणसांच्या प्रगतीचा चढता आलेख पाहिल्यानंतर त्याच्या हातून पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारण ठरणारे कृत्य घडत आहे. मात्र यामध्ये पर्यावरण रक्षणाच्या कर्तव्याचा आज विसर पडल्याचे जाणवते आहे. सर्व प्रकारची प्रदुषणे आज माणसांच्या दैनंदिन जीवनावर दुरगामी परिणाम करत असताना आपण पर्यांवरणाच्या शिलेदार असणाऱ्या वृक्षांची मोठया प्रमाणावर लागवड करणे आवश्‍यक आहे. याच सोबत होणारी वृक्ष तोंड व वृक्षांचे संवर्धन करणे देखील महत्वाचे आहे. आज मोठया प्रमाणावर जल, वायूप्रदुषण वाढले आहे आज पिण्यायोग्य पाण्याची भविष्यातील भेडसावणारी गंभीर समस्या यामध्ये पाण्याची बचत आपण कटाक्षाने केली पाहिजे. जल हे तो कल है म्हणाना आज मिळालेले पाणी उद्या मिळेलच याची खात्री देता येत नाही. देशातील विविध भागात दुष्काळाची परिस्थिती ओढावली असताना शेती, उद्योग, व सर्वच बाबीकरता पाण्याचे असलेले अनन्यसाधारण मुल्य आज जाणले पाहिजे. अन्यथा येणार्या काळात पाण्यासाठी मोठया युध्दांचा सामना करावा लागणार आहे.
योगेश कुंभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)