स्वीट मार्टमध्ये सुरक्षेसह स्वच्छतेला फाटा देत फक्‍त “फायद्याचा सौदा’

– संजय कडू

पुणे – स्वीट मार्टमधून निर्भेळ, आरोग्यदायी व स्वच्छ पदार्थ मिळावेत, अशी ग्राहकांची अपेक्षा असते. अन्न व औषध प्रशासन परवाना देतानाही तशा नियमांची माहिती मालकांस देते. तर, दुसरीकडे ग्राहक व कामगारांच्या सुरक्षेच्या दुष्टीने अग्निशमन दलही जागेची पाहणी केल्यावरच “एनओसी’ अर्थात ना-हरकत प्रमाणपत्र देते. मात्र, “एनओसी’ आणि परवाना मिळाल्यानंतर हे सर्व नियम धाब्यावर बसवले जातात. सुरक्षा आणि स्वच्छतेला फाटा देत फक्‍त फायद्याचा सौदा बघितला जातो.

काचेच्या काऊंटरमध्ये आकर्षकरित्या मांडलेली मिठाई पाहताचक्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल, अशी असते. त्याला लावलेला चांदीचा वर्ख तर अप्रतिमच. मात्र, मिठाई बनवण्यासाठी वापरलेले पदार्थ व ती बनवताना भटारखान्यातील अस्वच्छता कोणालाही दिसत नाही. दिवाळीत सापडलेला बनावट खवा, गुजरातहून आलेली कमी दर्जाची स्पेशल मिठाई, वर्षातून एखाद्या दुसऱ्या ठिकाणी पडलेली “एफडीए’ची धाड अशा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या कारवाया वगळता खाद्यपदार्थ क्षेत्रातील अस्वच्छता व असुरक्षिततेसंदर्भात मात्र कधीच चर्चा होताना दिसत नाही. ही बाब लक्षात घेऊन दैनिक प्रभातने “ग्राऊंड झिरो’ रिपोर्ट तयार केला असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

भटारखाने पाहताच उडते पदार्थांवरील मन
शहरातील मध्यवर्ती भागातील काही नामांकित स्वीट सेंटर वगळता, उपनगर व इतर ठिकाणी स्वीट सेंटरचे भटारखाने बघता तुमचे चटपटीत व गोड-धोड खाण्यावरचे मन उडेल, अशी अवस्था आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरातील एका नामांकित स्वीट सेंटरच्या समोशाच्या चटणीत उंदीर सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, असे अनेक उंदीर समोशाच्या सारणावरुन तर कधी भरुन ठेवलेल्या समोशावरुन रात्रभर फिरताना कोणाच्याही ध्यानी-मनी नसेल. स्वीट मार्टमध्ये सकाळीच सामोसा, कचोरी, ढोकळा अशा पदार्थांना मागणी असते. यामुळे याची तयारी रात्रीच केली जाते. भटारखान्यात रात्रीच समोसा व कचोरीचे सारण करुन ठेवलेले असते. भटारखान्यांतील अस्वच्छेमुळे उंदीर, झुरळ हे रात्रभर त्यावरून फिरतात. हे समोसे पहाटे भरण्याचे व तळण्याचे काम करणारे कारागिर झोपेतून उठून थेट भटारखान्यात आलेले दिसतील. समोसा व कचोरीचा घाणा तळल्यावरच ते आंघोळीला जातात. बहुतांश स्वीट सेंटरचे भटारखाने दुकानाच्या आतल्याच बाजूला असतात. यामुळे व्हेंटिलेशनची (मोकळी हवा) पुरेशी सोय नसल्याने घामाघूम झालेले आचारी आपला घाम गाळतच तुमच्या आवडीचे चटपटीत व गोड पदार्थ बनवताना दिसतात. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही मालकाने कोणतीच काळजी घेतलेली दिसत नाही.

भेसळीचा खवा, कृत्रिम स्वीटनर आणि ऍल्यूमिनिअमचा वर्ख
सणासुदीला खव्यामध्ये होणारी भेसळ तर नित्याचीच झाली आहे. गुजरातमार्गे आलेला बनावट व कमी दर्जाचा खवा आणि स्पेशल मिठाईवर दरवर्षी अन्न व औषध प्रशासन धाड टाकते. विशेषत: हा उपनगर आणि वस्त्यांमधील स्वीट सेंटरमध्ये याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. हा खवा डालडा, मैदा आणि रसायने एकत्र करुन तयार केला जातो. तर ग्रामीण भागामध्ये मिठाई व पेढ्यांमध्ये सर्रास पिठी साखरेची भेसळ असते. मिठाईला लावलेला चांदीचा वर्ख हाताने काढल्यास तो काळा झाला, तर हमखास समजावे तो ऍल्यूमिनिअमचा वर्ख आहे. चांदीचा वर्ख महाग असल्याने काही नामांकित स्वीट मार्ट वगळत इतरत्र सर्वत्र ऍल्यूमिनिअमचा वर्खच वापरला जातो. मिठाई आकर्षक दिसण्यासाठी तसेच तिच्या स्वादासाठी कृत्रिम रसायने व रंग वापरला जातो. हा रंग ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वापरला जातो. तो आरोग्यास अतिशय हानिकारक असतो. तर दुसरीकडे सारखरेपेक्षा कृत्रिम स्वीटनर स्वस्त असल्याने ते वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे.

भटारखान्यांची सुरक्षाही वाऱ्यावर
स्वीट मार्ट असो व बेकरी त्यांचे भटारखाने असुरक्षितच असल्याचे आढळते. आग विझविण्यासाठीची कोणतीही सक्षम यंत्रणा नसते. तशी यंत्रणा असली, तर ती कालबाह्य झालेली असणे, बहुतांश ठिकाणी भटारखान्यातून बाहेर पडण्यासाठी वेगळा रस्ता नसणे अशा असुरक्षित व अस्वच्छ वातावरणात भटारखान्यातील कामगारांना काम करावे लागत आहे.

अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) कायदा सक्षम आहे, मात्र त्याची अंमलबजावणी त्या पद्धतीने होत नाही. “एफडीए’कडे पुरेसे मनुष्यबळ नाही. तर दुसरीकडे ग्राहकही जागरूक नाहीत. यामुळे यासंदर्भातील तक्रारींचे प्रमाण खूपच कमी आहे. “एफडीए’ने पुरेशी जनजागृती करणे आवश्‍यक आहे. ग्राहकांना कायद्याची व त्यांच्या हक्कांची माहिती उपलब्ध करुन दिली पाहिजे. यासाठी प्रचार व प्रसार केला, तरच नागरिक सजग होतील. स्वीट मार्ट व बेकरीसंदर्भात तक्रारी असूनही केवळ माहितीच्या अभावी नागरिक पुढे येत नाहीत.
– महेंद्र दलालकर, अध्यक्ष, ग्राहक संघ


स्वीट मार्ट आणि हॉटेल दोन्हींसाठी अग्निशमन दलाची “एनओसी’ बंधनकारक आहे. यानंतरच आरोग्य किंवा अन्न औषध प्रशासनाचा परवाना दिला होता. अग्निशमन दल “एनओसी’ देताना जागेची पाहणी करते. भट्टी, गॅस सिलिंडर ठेवण्याची व्यवस्था आपत्कालिन प्रसंगी कर्मचाऱ्यांना बाहेर पडायचा रस्त्याची पाहणी करते. अग्नि सुरक्षेसंदर्भात काय काळजी घ्यायची व कोणते साहित्य ठेवायचे हे सांगितले जाते. यानंतरच अंतिम ना हरकत दाखल दिला जातो.
– प्रशांत रणपिसे, प्रमुख, अग्निशमन दल.


स्वीट मार्ट किंवा बेकरीसारख्या व्यवसायासाठीही “एफडीए’चा परवाना ऑनलाइन दिला जातो. परवाना अर्ज केल्यावर कागदपत्रांच्या काही त्रुटी असतील, तर तसा ई-मेल करुन कागदपत्रे मागवली जातात. परवाना देताना तत्काळ दिला जातो. प्रत्यक्षात तपासणी मात्र मनुष्यबळ उपलब्ध असेल, त्याप्रमाणे केली जाते. परवाना देताना अन्न औषध कायद्यातील परिशिष्ट-4 प्रमाणे काही नियम व अटींचे पालन परवानाधारकाने करणे आवश्‍यक असते. यामध्ये स्वच्छता आणि पदार्थांचा दर्जा महत्त्वाचा असतो. तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यास परवाना निलंबित केला जातो.
– सुरेश देशमुख, सह आयुक्‍त, अन्न व औषध प्रशासन.

…दहा लाख रु. दंड आणि 7 वर्षे कारावास
स्वीट मार्टमध्ये कमी दर्जाचा माल आढळल्यास परवाना निलंबित करण्याबरोबरच दोन लाख रुपयांपर्यंत दंह होऊ शकतो. ही कारवाई करण्याचे अधिकार सह आयुक्‍तांना आहेत. तर, पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास न्यायालयाकडून 5 लाख रुपयांपर्यंत दंड तसेच 6 महिने ते सात वर्षापर्यंत कारावास घडू शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.