स्वामी नित्यानंदचे देशाबाहेर पलायन

अहमदाबाद : गुजरात पोलिसांच्या रडारवर आलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू स्वामी नित्यानंद याने देशाबाहेर पलायन केल्याची माहिती पुढे आली आहे.

नित्यानंदच्या येथील आश्रमात ताब्यात ठेवण्यात आलेल्या लहान मुला-मुलींचा छळ होत असल्याचा आरोप आहे. त्यावरून वादग्रस्त नित्यानंदकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.

आश्रम चालवण्यासाठी अनुयायांकडून देणग्या लाटण्यासाठी लहान मुला-मुलींचा गैरवापर केला जात असल्याच्या आरोपावरून नुकताच नित्यानंद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आश्रमाच्या दोन व्यवस्थापिकांना अटक करण्यात आली. आता नित्यानंदला ताब्यात घेण्यासाठी हालचाली केल्या जाणार आहेत.

त्याच्याविरोधात काही वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तो भारताबाहेर पसार झाला. त्यामुळे त्याला परदेशातून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे सूतोवाच गुजरात पोलिसांनी केले आहे.

नित्यानंदशी संबंधित प्रकरणाचे पाळेमुळे खणून काढण्यासाठी गुजरात पोलिसांचे विशेष पथक स्थापन केले जाणार आहे. नित्यानंदच्या विरोधात ठोस पुरावे मिळवण्यासाठी ते पथक सक्रिय राहील. भारतात परतल्यास नित्यानंदला निश्‍चितच अटक केली जाईल, अशी ग्वाही गुजरात पोलिसांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.