स्वातंत्र्य मिळालं तरीही आपण पारतंत्र्यात -नागराज मंजुळे

 मुर्टे-मोढवेत “संवाद सहवास’ कार्यक्रमात प्रतिपादन

सोमेश्वरनगर- स्वातंत्र्य हे मूल्य सगळ्यात भारी आहे; पण त्या खालोखाल सगळ्यात भारी मूल्य कोणतं असेल तर ते प्रेम, हे आहे. प्रेम करणं ही माणसाची आंतरिक ऊर्मी आहे, या ऊर्मीला दाबलं जात असल्यामुळं आजही आपण पारतंत्र्यात आहोत, असं मत सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं. “अक्षर मानव’ आयोजित “संवाद सहवास’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुर्टी-मोढवे येथील यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळा इथं शनिवारी दिवसभर झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागातून 200 जण सहभागी झाले होते. “अक्षर मानव’चे संस्थापक ज्येष्ठ लेखक राजन खान यांनी या कार्यक्रमामागील भूमिका समजावून सांगितली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी प्रा. डॉ. राहुल खरात यांच्या “जगण्याच्या आतली गोष्ट’ या कथासंग्रहाचे तर क्षितिज देसाई यांच्या ससूर्य पाहिलेल्या माणसांची गोष्ट’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन मंजुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी वनिता मगर, रेश्‍मा ठोसर, अशोक जाधव, राजू बडदे, संतोष शेंडकर, विश्वनाथ टेंगले, वृषाल निरगुडे, संपत ठोंबरे उपस्थित होते.

यावेळी मंजुळे म्हणाले की, आजकाल मला गर्दीची दहशत वाटते. गर्दीत जायला नको वाटतं. गर्दीतून एखादा चेहरा येतो, तो माझ्याबरोबर सेल्फी काढतो आणि सेल्फी काढल्या काढल्या निघूनही जातो. एखाद्याचं पाकीट मारलं गेल्यावर त्याला जसं वाटेल तसंच काहीसं मला या सेल्फी घेणाऱ्यांबाबत वाटतं. एका शब्दाचाही संवाद करायला ते उत्सुक नसतात. त्यामुळं मी जाहीर भाषणं बंद केली आहेत. गौतम बुद्धांसारख्या कितीतरी हुशार, शहाण्या माणसांनी माणसाच्या आंतरिक ऊर्मीला जपलं पाहिजे, हे सांगून ठेवलं आहे. स्वातंत्र्य, प्रेम या मूल्यांची ओळखही याच शहाण्या माणसांनी करून दिली आहे. आपल्या इथं लोक रस्त्यात मारामारी करू शकतात, थुंकू शकतातव पण कुणीही रस्त्यात एकमेकांना मिठी मारू शकत नाही. द्वेष करणाऱ्या माणसांचे सत्कार होताना दिसतात; पण प्रेम मात्र गुपचूप करावं लागतं. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. स्वातंत्र्यानंतर कोणतं मूल्य महत्त्वाचं असेल तर ते प्रेम हेच आहे.”

तुम्ही हॉरर फिल्म भविष्यात बनवणार का?’ या प्रश्नावर नागराज म्हणाले, तुमच्या शेजारी बसलेला माणूस तुमच्या जातीचा नाही, ही भावना मनात येणं, हेच मला खूप हॉरर वाटतं.’ खरं तर आपल्या इथं एकट्या माणसांनी खूप मोठी कामं करून दाखवली आहेत. शिवबा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, र. धों. कर्वे, बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काम करून ठेवलं ते एकत्र समूहाला करता आलं नाही. त्यांनी जे सांगितलं ते अंमलात आणता आलं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

  • जवळ काहीही नसताना शिवाजीसारखा हा माणूस स्वराज्याच्या प्रेरणेनं उभा राहतो. त्यांची आई जिजाऊ त्याला प्रेरित करते आणि मावळ्यांच्या मदतीनं वेगवेगळी युद्ध कौशल्ये शोधून काढत हा माणूस स्वराज्याची निर्मिती करतो. शिवाजी राजाचा हा प्रवास मला खूप भारी वाटतो. त्यामुळंच शिवाजी महाराजांवर चित्रपट करण्याची मला इच्छा आहे.
    नागराज मंजुळे यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.