स्वाईन फ्ल्यू संदर्भात राज्यस्तरीय पथक आज साताऱ्यात

सातारा- स्वाईन फ्ल्यूचा प्रार्दुर्भाव पसरला असल्याने, सध्या नागरीकांमध्ये विशेष करुन, शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तथापि जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी या संकटावर मात करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. आम्ही याबाबत राज्यस्तरावरील संबंधीतांशी बोललो असून, राज्यस्तरीय पथक आज साताऱ्यात दाखल होत आहे. स्वाईन फ्ल्यू आजारावर मात करण्यासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. तसेच स्वाईन फ्ल्यू होवू नये म्हणून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नागरीकांनी कठोरतेने पालन करावे आणि या साथीच्या रोगावर सामुहिक प्रयत्नामधुन मात करण्यासाठी आपापले योगदान द्यावे असे आवाहन सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

स्वाईन फ्ल्यूच्या भीतीनेच काही व्यक्‍तींची गाळण उडाली आहे, त्यांची भीती साधार असली तरी सुध्दा नागरीकांनी मानसिक दृष्टया खचुन जावू नये असे स्पट करुन, खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, सातारा शहराच्या आजुबाजुच्या उपनगरीय परिसरात स्वाईन फ्ल्यू या साथीच्या रोगाने पाय पसरले आहेत ही वस्तुस्थिती खरी असली तरी त्यावर मात करण्यासाठी जिल्हयातील आरोग्य यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. लवकरच या साथीच्या रोगावर आळा घातला जाईलच, तथापि नागरीकांनी स्वाईन फ्ल्यू होवू नये म्हणून जी दक्षता घेणे गरजेचे आहे ती दक्षता जास्तीत जास्त घ्यावी. याबाबत शासनाने काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार संशयीत रुग्ण किंवा स्वाईन फलु झालेला रुग्ण याच्या जवळ सहा फुटाचे आत जावू नये, थिएटर, नाटयगृह, एअर कंडीशन मॉल इत्यादी बंदिस्त व गर्दीच्या ठिकाणी जावू नये, बाहेरुन जावून आल्यावर साबणाने हात धुवावेत-कारण स्वाईन फ्ल्यूचे विषाणु लागण झालेल्यांच्या खोकल्यांतुन, शिंकामधुन बाहेर पडून, टेबल खुर्ची, बस अश्‍या आसपासच्या ठिकाणी स्थिरावून तीन ते आठ तास जिवंत राहतात, त्याच कारणासाठी नाक चेहरा याला हात लावायचे टाळावे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकमेकांना भेटताना, हस्तांदोलन करु नये, संशयित रुग्णांनी घराबाहेर पडु नये, शासकीय यंत्रणेतून मिळणाऱ्या गोळयांचा कोर्स पूर्ण करावा, शिंकताना किंवा खोकताना चोपदरी रुमाल नाका-तोंडापुढे धरावा, घरातील फरशी, टेबल इत्यादी फिनेलच्या पाण्याने रोज पुसायला हवे, भरपुर पाणी प्यावे, नीट आहार घ्यावा, इत्यादी महत्वाच्या सूचनांचे पालन करावे,
शासनपातळीवर आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी आवश्‍यक असणारा औषध साठा उपलब्ध आहे. तसेच जादा साठा उपलब्ध करुन घेतला जात आहे. स्वाईन फ्ल्यूवर मात करण्याच्या प्रयत्नांत कोणतीही यंत्रणा किंवा विभाग कमी पडू नये म्हणून आमचे विशेष लक्ष राहणार आहे, नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून सार्वजनिक स्वच्छता सुयोग्य ठेवणेबाबत आम्ही सातारच्या नगराध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत. राज्यशासनाच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भोये, सहसंचालक डॉ. प्रदिप आवटे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक परिस्थितीचा नियोजनात्मक आढावा घेण्यासाठी साताऱ्यात येत आहे.

सर्व तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामिण रुग्णालयांचे अधिक्षक तसेच खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांची संयुक्‍त बैठक या पथकाच्या उपस्थितीत सिव्हील हॉस्पिटल, सातारा येथे होणार आहे. या बैठकीत स्वाईन फ्ल्यूच्या रोगावर मात करण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करुन, संपूर्ण जिल्हयात संबंधीत विभागांकडून कार्यक्षम कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जावून, या साथीच्या रोग संकटावर मात करण्यासाठी सर्वांनीच सांघिक प्रयत्नांमध्ये आपले योगदान द्यावे असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)