स्वाईन फ्ल्यू, डेंग्यूमुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये – आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

मुंबई: पुणे शहर व परिसरात वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांचे सर्वेक्षण वाढवावे, सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे 24 तासापेक्षा जास्त काळ राहिल्यास स्वाईन फ्लू प्रतिबंधक औषधोपचार सुरु करावेत. पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयांचा या संदर्भात आठवड्यातून आढावा घ्यावा, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज पुणे येथे दिले.

यंत्रणेला दक्षता घेण्याबाबत सूचना देतानाच नागरिकांनी घाबरुन न जाता प्रतिबंधात्मक उपाय योजावेत, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी आज पुणे येथे भेट दिली. साथरोग संदर्भातील आढावा बैठक घेऊन स्वाईन फ्लू प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

ऑगस्ट महिन्यात राज्यात आणि पुणे शहर व ग्रामीण विभागात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वातावरणातील बदल व पुर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष देण्याबाबतच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये स्वाईन फ्ल्यूसाठी लागणाऱ्या औषधांचा आढावा घेण्यात आला. 2018 साठी ट्रायव्हॅलेंट लस वापरणे योग्य असल्याबाबतचा निर्वाळा एनआयव्हीमधील तज्ज्ञांनी दिला असून ऑसेलटॅमिविर या औषधासोबतच झानामीवीर औषध देखील उपलब्ध असण्याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाला अवगत करावे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात जून अखेरपर्यंत एक लाख 28 हजार अतिजोखमीच्या व्यक्तींना स्वाईन फ्ल्यूचे लसीकरण करण्यात आले आहे.

सध्या फ्ल्यू सर्वेक्षण अधिक सक्षम करुन सर्व संशयित रुग्णांना त्यांच्या आजारांच्या वर्गीकरणानुसार दोन दिवसांच्या आत उपचार सुरु होणे आवश्यक आहे. विविध माध्यमातून जनतेला फ्ल्यू प्रतिबंधविषयक आरोग्य शिक्षण देण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच जे रुग्ण गंभीर आहेत त्यांचा दैनंदिन पाठपुरावा करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या. पुणे शहर आणि ग्रामीण भागातील डेंग्यू परिस्थितीचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. पुणे शहर आणि परिसरात डेंग्यू नियंत्रणाकरिता गॅरेजवर विशेष लक्ष देण्यात यावे. डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यू संदर्भातील मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयात ठळकपणे प्रदर्शित करण्यात याव्यात. महापालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांचे प्रबोधनपर कार्यशाळा घ्याव्यात. महापालिका आयुक्तांनी आठवड्यातून एकदा खासगी रुग्णालयांची बैठक घ्यावी, असे निर्देश यावेळी डॉ. सावंत यांनी दिले.

बैठकीनंतर त्यांनी नायडू हॉस्पिटल आणि वाय सी एम रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांची विचारपूस केली. नायडू संसर्ग रुग्णालयाला व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)