स्वाईन फ्ल्यूचे जिल्ह्यात आणखी दोन बळी

फलटण / नागठाणे, दि. 30 (प्रतिनिधी) -जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या साथीने हाहाकार उडविला असून आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असतानाच आज पुन्हा जिल्ह्यातील आणखी दोघांचा स्वाईन फ्ल्यूने बळी गेल्याने मृतांचा आकडा 14 वर पोहोचला आहे. आज स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झालेल्यांमध्ये फलटण येथील गर्भवती महिलेचा तर अंगापूर वंदन येथील एकाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात आजवर स्वाईन फ्ल्यूचे 137 रुग्ण आढळून आले आहेत.
फलटण शहरातील संत बापूदास नगरमधील आठ महिन्यांच्या गरोदर असलेल्या सौ. सीमा विशाल भुजबळ (वय 28) यांना पंधरा दिवसांपुर्वी थंडी ताप व अशक्तपणा जाणवू लागल्याने फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 4 दिवस उपचार घेऊन काहीच फरक न पडल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. औषधोपचार व तपासणी सुरु असताना रिपोर्ट आला असता त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले. त्यामुळे सीमा यांचे सिझर करण्यात आले. त्यांना मुलगा झाला. मुलाची प्रकृती चांगली असून बाळाला स्वाईन फ्लूची लागण झालेली नाही. यापुर्वी त्यांना 6 वर्षाचा मुलगा आहे. तथापि, उपचार घेत असलेल्या सौ. सिमा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. शनिवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पश्‍चात पती, सासू, सासरे, दीर, भावजय, दोन मुले असा परिवार आहे.
तर अंगापूर वंदन (ता. सातारा) येथील अनंत आप्पाजी कणसे (वय 50) यांचादेखील रविवारी पहाटे पुणे येथील रूबी हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. यामुळे अंगापूर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अनंत कणसे यांना सर्दी, खोकला व तापाचा त्रास उद्‌भवला होता. यासाठी त्यांनी गावातील खाजगी दवाखान्यात उपचार घेतले होते. परंतु, दोन-तीन दिवसानंतरही काहीच फरक न पडल्याने घरातील सदस्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. याठिकाणी त्यांनी बरे वाटत नसल्याने तसेच श्‍वास घेण्यास त्रास होवू लागला. यावेळी त्यांची अधिक तपासणी केले असता कणसे यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना तातडीने पुणे येथील रूबी हॉस्पिटलला हलविण्यात आले होते. गेली पंधरा ते वीस दिवसांपासून त्यांच्यावर याठिकाणी उपचार सूरू होते. परंतु, रविवारी पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)