स्वरुपाक्षर

आपलं हस्ताक्षर हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतं. त्या अर्थानं ते फक्त हाताचं अक्षर उरत नसून स्वरूपाचं म्हणजे व्यक्तीच्या संपूर्ण अस्तित्वाचा आरसा असतं. मग त्या लेखी ऐवजाला स्वरूपाक्षर म्हणणं अधिक योग्य ठरावं, नाही का? त्याच्या दाण्यासारखे सुंदर अक्षर हा खूप हेवा करण्यासारखा गुण आहे. शब्दार्थापर्यंत पोचायला वेळ लावता यावा इतकी ताकद या अक्षरांच्या सौंदर्यात असते, हे मान्य; परंतु अक्षर सुंदर म्हणजे स्वभाव सुंदर हे मात्र अमान्य. आयुष्यभराच्या अनुभवांती, अमान्य. असो. वाचन आपल्यावर कळत नकळत किती प्रभाव टाकतं. आपल्या सवयी, आवडीनिवडी घडवतं.

रेबेका कादंबरी मला प्रचंड आवडायची. शांतीप्रसाद भटनागर यांनी केलेला हिंदी अनुवाद घरी होता. अक्षरशः पारायणं केली त्याची. लग्नानंतर नाव बदललं. जोडीनं बसून बदललेली सही कशी असावी याचा एक रोमॅंटिक सोहळा झाला. आता पहिले अक्षर ठ झालं. सही ठरवून, गिरवून तयार झाली आणि मग सावकाश कधीतरी, कितव्यांदातरी रेबेका वाचताना लक्षात आलं, “अरेच्चा! आपली सही बरीचशी रेबेका सारखी झालीय!’ मग स्वतःला तपासून पाहणं आलं. पण तो वेगळा विषय. आता तरी पुस्तकातल्या ओळी दिसतात… एक बडासा, तिरछा ठ जिसके सामने बाकी अक्षर बौनेसे लगते थे…

लिहायला सुरुवात केली की मस्त अक्षर असतं. मग हळूहळू वेग वाढतो विचारांचा. हात थकायला लागतो, विचारांशी जुळवून घेताना आणि अक्षरांचा समतोल बिघडायला लागतो. फराटे उमटू लागतात. जणू काही पाय ओढत चालणारे शब्द. अर्थासोबत कुस्ती खेळून दमल्यासारखे ते मधेच कागदावर फतकल मारून बसतात. मग मागचा शब्द पुढच्याला ढुसण्या देऊन उठवतो की, “बाबारे उठ… अजून कागद संपायचाय, विचार थांबायचाय. असं दमून नाय चालणार गड्या.’ मग पुन्हा काही वाक्‍यं नेटकी उमटतात की, परत ये रे माझ्या मागल्या. अक्षरं फिकट, धुरकट होतात. शाई संपून पुसट होतात. पण विचार काही दमायचे नाव घेत नाहीत. त्यांचं थांबायचं ठिकाण एकच. एक चुकार थेंब ओघळून लिहिलेला शब्द धुऊन टाकू लागला ना की मगच थांबतात ते… आणि शब्द श्‍वास टाकतात.

हस्ताक्षरतज्ज्ञ असतात. तुमच्या सु वा कु लेखनाची तपासणी करून तुम्हाला ज्ञातअज्ञात असलेले तुमच्या स्वभावातील कंगोरे, गुणदोष इत्यादी सांगतात. यातून भविष्य कसे सांगता येते ते माहीत नाही. अक्षरांचे वळण बदलून स्वभाव कसा बदलतो तेही मला समजलेले नाही. माझे अक्षर वैट्ट आहे. त्यामुळे अर्थातच स्वभाव चांगला कुठून असणार? की ते उलट आहे? जाऊ दे. आता दोन्हीपैकी काय एक बदलणे अवघड. अशक्‍य नाही. पण कठीण.

एक तज्ज्ञ भेटले होते. ते सहीवरून स्वभाव जोखतात. त्यातून तुमचे व्यक्तिमत्त्व दिसते असा त्यांचा दावा. माझ्याबाबत सांगितलेल्या तीन मुद्द्यांपैकी दोन बरोबर, एक चूक आला. त्यांनी व्याख्यानात सांगितले की, ते चेकवर आणि पत्रांवर अशा दोन वेगळ्या सह्या करतात. मग मी आभार प्रदर्शन करताना त्यांना एक प्रश्‍न विचारला की, तुम्ही जर दोन वेगळ्या सह्या करता तर तुमची दोन भिन्न व्यक्तिमत्त्व आहेत का? यावर ते गडबडले आणि तीन वेळा एकच वाक्‍य म्हणाले की, म्हंजे… अं… मी करतोच ना वेगळ्या सह्या… अं… अं… नक्‍की कुठल्या व्यक्तिमत्त्वाने उत्तर द्यायचे, हे त्यांचे ठरले नसावे.

माझ्या एक आजी मैत्रीण म्हणाल्या, यातून तुझा शेलका स्वभाव दिसला. म्हणजे काय तरी बरं असावं असं वाटतंय. चुकून बरं. हे बहुतेक त्या सहीत नव्हतं वाटतं. लहानपणापासून मी अक्षरशत्रू. म्हणजे अक्षर माझे शत्रू. सुंदर अक्षर हाच जो खरा दागिना. तोच कायम माझ्यापासून लांब राहिलेला. या बाबतीत मी लंकेची पार्वती! प्राथमिक अवस्थेत तर स्वतःचे अक्षर स्वतः वाचायची पण मारामार. मग रोज संध्याकाळी गृहपाठ विचारायला मैत्रिणीच्या घरी. तिची आणि माझी आई, दोघीही एकच प्रश्‍न विचारायच्या, अग तू पण जातेस ना शाळेत? मग? आता काय सांगू रडकथा. मग सावकाशीने ते “सु’ नाही तरी निदान “वाच्य’ झाले आणि रोजची नामुष्की टळली. सातवीत असताना, हस्ताक्षर सुधारावे म्हणून मी जंग जंग पछाडले. आईच्या मागे लागून सुरेखा स्लेट आणून आरपार भोकं पडेस्तो गिरवली. शून्य परिणाम. अक्षर चांगले नाही म्हणून बाई बोलायची एक संधी सोडायच्या नाहीत. का नाही माझे अक्षर छान? या विचाराने मला वेड लागायची पाळी आली होती. सावकाश, मंदगतीनं लिहिण्याचा एक प्रयोग करून पाहिला; परंतु रोजच्या पर्वतप्राय गृहपाठाचे शिखर असे कुर्मगतीने गाठणे अशक्‍य झाले. क्‍या करू कौन दिशामा जाऊ? अशा भ्रमित अवस्थेत अचानक दिवा लागला! मनमा एक विचार आया! “आता मी कोणत्या हाताने लिहितेय? उजव्या? म्हणजे उजव्या हाताचे अक्षर वाईट आहे. झालं तर मग. आता मी डाव्या हाताने लिहायला शिकेन! आणि मुळातच सुंदर वळण लावेन. म्हणजे प्रश्‍नच मिटला!’ जितम जितम!

लगेच पाटी पेन्सिल आणून गिरवंती सुरू झाली. आधीच लिहिता येत होतं, ते एक बरंच झालं. घरचा अभ्यास, कामं उरकली की, उरलेला वेळ, मान खाली घालून एक एक अक्षर सुरेख आकारात कोरणे, हेच फक्त कार्य. शिवधनुष्य तर उचलले होतं. आता राम म्हणायचे नाही म्हणजे नाही. हळूहळू, पण निश्‍चितपणे प्रगती होऊ लागली. कशी कोण जाणे, आमच्या मुख्याध्यापिका बाईंना याची खबर लागली. आईच असणार. लगेच शिक्षकांच्या खोलीमध्ये मला बोलावणं आलं. शिक्षकांनी घेराव घातलेली एकमेव विद्यार्थिनी असणारी बहुतेक मी. मग माझी यथास्थित शाळा घेण्यात आली. त्यांच्या मते हे अशक्‍य होतं. अक्षरांचे वळण हे हातात नसून मेंदूत असतं आणि ते बदलता येत नसतं. माझे मत होते की मी ज्या हाताने लिहीन तसे वळण माझा मेंदू अक्षराला देईल. दोन्ही अक्षरात उघड उघड फरक दिसत होता. पण सर्वसंगनमताने माझा उपक्रम बंद पाडण्यात आला. खूप वाईट वाटलं. रागही आला. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर मी आणिक प्रयत्न करून अक्षर चांगले केलं. या सगळ्यात डाव्या हातानं लिहिण्याचा सराव मागे पडला आणि वेगही साध्य झाला नाही. पण लिहिता येऊ लागलं, ही जमेची बाजू. यथावकाश सव्यसाची, अपूर्वभारतीवाली, वाचनात आली. सव्यसाची शब्दाचा अर्थ समजला. बरं वाटलं. फक्त प्रयत्न सोडून दिला याचं अजूनही वाईट वाटतंय.

तर सांगायचं असं की उद्या समजा माझ्या उजव्या हाताला काही झालं तरी तुमची सुटका नाही हो. हम डावे हाथसे लिख्खुंगा। मतबल टायपुंगा। मगर लिख्खुंगा जरूर! हे सगळं झालं लिहित्या हाताचं रामायण. जे कधी लिहावाचायला शिकलेच नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलावं? मनुष्य कागदावर काळं करू शकत नाही म्हणजे स्वभावानं उजळ असत नाही काय? निरक्षर परंतु लखलखीत गोऱ्या मनाची माणसं पाहिली की ही असली शास्त्र अतिरंजित वाटतात. ती खरी नसतात, असं नाही; पण तीच फक्त एकमेव सत्य असतात, हे मात्र बरोबर नाही. शुभ्र असतं ते अंधारातही लकाकतंच. त्याला पुराव्यानं शाबीत करण्याची गरज उरत नाही. इत्यलम.

सुचरिता

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here