स्वराज्याची खरी प्रेरणा राजमाता जिजाऊ : राजेंद्र घावटे

निगडी – शिवाजी महाराजांनी उभे केलेले रयतेचे राज्य म्हणजे युगानुयुगे आदर्श वाटावा असे आहे. अठरा पगड जातीला एकत्र आणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून मिळवलेले स्वराज्य हा पृथ्वीवरील मोठा चमत्कार होता. शिवाजी आणि संभाजी असे दोन छत्रपती घडवणाऱ्या, रयतेचे राज्य निर्माण करून स्वत्व आणि स्वाभिमानाचे स्फुल्लिंग जागृत करणाऱ्या राजमाता जिजाऊ खऱ्या अर्थाने स्वराज्य संस्थापक ठरतात. लोकाभिमुख राज्य निर्माण करण्याची खरी संकल्पना जिजाऊंच्या शिकवणीतून मिळाली. जिजाऊंच्या संस्कारातून आणि प्रेरणेतून शिवाजी महाराजांसारखा युगप्रवर्तक राजा घडू शकला, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले.

पूर्णानगर येथील मध्ये आयोजित कार्यक्रमातील “राजमाता जिजाऊ मॉंसाहेब’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी दत्तात्रय यादव, लहुराज ढवळे, विलास पाटील, अरुण नलावडे आदी उपस्थित होते. महिला, विद्यार्थी व नागरीक प्रचंड संख्येने उपस्थित होते. घावटे पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढला. रयतेचे दुःख दूर करण्यासाठी स्वकीयांचे राज्य निर्माण करण्याची महत्वकांक्षा त्यांनी बाळगली होती. स्वकीय परकीयांच्या चाकरीत धन्यता मानत असत. परंतु रयत मात्र अन्याय आणि अनाचाराने त्रासली होती. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांना बालपणापासून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. एक चारित्र्यसंपन्न, नीतिमान, पराक्रमी, किर्तीवंत राजा म्हणून निर्माण केले. मुलांच्या जडणघडणी साठी जिजाऊंचे चरित्र अभ्यासणे गरजेचे आहे. मुलांना कणखर बनवून विविध क्षेत्रातील शिवाजी निर्माण करण्यासाठी घरोघरी जिजाऊंच्या चरित्राचे पारायण झाले पाहिजे. ती खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. असे सांगत त्यांनी जिजाऊंच्या बालपणापासून तर शिवराज्याभिषेक पर्यंतचे अनेक प्रसंग सांगत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. राजेंद्र घावटे यांचा पुणेरी पगडी, उपरणे व सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुबोध गलांडे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)