स्वप्ना बर्मन, अर्पिंदर सिंग यांचे विक्रमी सुवर्णयश

आशियाई क्रीडास्पर्धेतील भारतीय ऍथलीटची घोडदौड कायम

जकार्ता: भारताचे युवा ऍथलीट स्वप्ना बर्मन आणि अर्पिंदर सिंग यांनी अनुक्रमे महिला हेप्टॅथलॉन आणि पुरुषांच्या तिहेरी उडीत विक्रमी सुवर्णपदकांची कमाई करताना आशियाई क्रीडास्पर्धेचा आजचा दिवस गाजविला. द्युती चंदने महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत मिळविलेल्या रौप्यपदकामुळे भारताचे यश अधोरेखित झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वप्ना बर्मनने महिलांच्या हेप्टॅथलॉनमध्ये भारताला पहिले आशियाई सुवर्ण मिळवून देताना ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. विशेष म्हणजे असह्य दातदुखीने त्रस्त असतानाही तिने हे यश मिळविले. स्वप्नाने सात क्रीडाप्रकारांमध्ये मिळून 6026 गुणांची कमाई करीत अव्वल स्थान मिळविले. तिने उंच उडी (1003 गुण) व भालाफेक (872 गुण) यात पहिला क्रमांक मिळविला. तर गोळाफेक (707 गुण) व लांब उडीत (865 गुण) दुसरा क्रमांक मिळविला.

स्वप्नाला 100 मी. शर्यतीत पाचव्या व 200 मीटर शर्यतीत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. परंतु तोपर्यंत तिने सुवर्णपदकाची निश्‍चिती केली होती. चीनच्या वांग क्‍विंगलिंगने (5954 गुण) रौप्यपदक, तर जपानच्या युकी यामासाकीने (5873 गुण) कांस्यपदकाची कमाई केली. हेप्टॅथलॉनमध्ये याआधी केवळ सोमा बिस्वास, जेजे शोभा व प्रमिला अय्यप्पा यांनीच पदके मिळविली होती.

अर्पिंदर सिंगने पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारांत सुवर्णपदक पटकावताना तिहेरी उडी प्रकारात भारताने तब्बल 48 वर्षांनंतर सोनेरी यश मिळविले आहे. याआधी 1970 आशियाई स्पर्धेत मोहिंदर सिंग गिलने भारताला तिहेरी उडीत सुवर्णपदक जिंकून दिले होते. अर्पिंदरने 16.77 मीटर उडी घेत सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. त्याने तिसऱ्या प्रयत्नांत ही कामगिरी केली. उझबेकिस्तानच्या रुस्लान कुर्बानोव्हने 16.62 मीटर उडी घेताना रौप्यपदकाची निश्‍चिती केली. तर चीनच्या शुओ कावला 16.56 मीटर उडीसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मात्र अर्पिंदरची आजची कामगिरी त्याच्या सार्वोत्तम वैयक्‍तिक कामगिरीच्या जवळपासही नव्हती. गेल्या आशियाई स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या अर्पिंदरची सर्वोत्तम वैयक्‍तिक कामगिरी 17.17 मीटर अशी असून या मोसमातील त्याची सर्वोत्तम कामगिरीही 17.09 अशी होती. जूनमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली होती. त्यामुळे आशियाई मानांकनात तो तिसऱ्या क्रमांकावर गेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)