स्वप्नपूर्तीपर्यंत शिक्षणाचे मैदान सोडू नका

थेऊर- मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होईपर्यंत शिक्षणाचे मैदान सोडू नये, फालतू गोष्टीच्या आहारी न लागता ध्येय पूर्तीसाठी झपाटलेल्याप्रमाणे अभ्यास करा, यश तुमच्याकडेच असेल, असा सल्ला लोणी काळभोरचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिला. थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणी विद्या मंदिरात नायगाव – पेठ (ता.हवेली) येथील अल्ट्राटेक कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

इंगवले म्हणाले की, मराठी माध्यमाच्या शाळेतून माझाही जीवनप्रवास झाला आहे. मात्र, आई, वडिलांच्या कष्टाची जाण उराशी बाळगली. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष कायम ठेवून शिक्षण पूर्ण केले. स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे गेलो. परिस्थिती बदलायची व शासकीय अधिकारी व्हायचे आहे, हेच स्वप्न उराशी बाळगून ध्येयपूर्तीसाठी खूप अभ्यास केला, आज सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून खाक्‍या वर्दीत तुमच्यासमोर उभा आहे. तुम्ही ध्येयपूर्तीसाठी कष्ट, चिद्द, चिकाटीचा ध्यास घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी पैलवान युवराज काकडे, कंपनीचे मुख्य अधिकारी श्रीवास्तव, मुख्याध्यापिका शोभा कोतवाल, रुपचंद बोडके, हेमंत कांबळे उपस्थित होते.

चिंतामणी विद्या मंदिर शाळेला पुढील वर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे माजी विद्यार्थी पैलवान युवराज काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या भागातील अल्ट्राटेक कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी व विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात मदत करण्यासाठी विनंती केली होती. यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यापुढेही शैक्षणिक कार्यास मदत करण्यासाठी कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.