स्वत:च्या नाकर्तेपणाचे खापर दुसऱ्यावर फोडून प्रश्‍न सुटणार आहे का?

आ. शिवेंद्रसिंहाराजेंचा सवाल; लोकांच्या भावनांशी खेळणे बंद करा

सातारा- सातारा पालिकेचा कारभार रामभरोसे सुरु आहे. सातारा पालिकेचा नियोजनशुन्य कारभार आणि स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आपले लोकप्रिय खासदार जिल्हाधिकाऱ्यांना दगड संबोधत आहेत. स्वत:चा नाकर्तेपणा लपवून विसर्जनाचा प्रश्‍न सुटणार आहे का? असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणेश मंडळांच्या मुर्तींचे विसर्जन कोठे करायचे याबाबत निर्णय घेण्यास आणि तोडगा काढण्यास सातारा पालिकेने खूपच उशीर केला आहे. आता गणेश मंडळांच्या बैठका घेवून आणि चर्चा करुन सत्ताधारी आपली चूक लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक विसर्जन कोठे करायचे याचा निर्णय गणेश मंडळे घेवू शकत नाहीत. त्यामुळे चर्चेचा फार्स कशासाठी केला? काही दिवसांपूर्वीच खासदारांनी रिसालदार तळ्यात विसर्जन करण्याचा निर्णय जाहिर केला होता. पोलीस प्रशासनाने मात्र विसर्जनास नकार दिला आहे. त्यामुळे मुर्ती विसर्जनाचा प्रश्‍न आता जटील बनला आहे. असे सांगून वाळू ठेक्‍यांचे परवाने हवे तसे मिळाले की जिल्हाधिकारी देव! आणि सातारा पालिकेतील भ्रष्टाचाराला चाप लावला की जिल्हाधिकारी दगड, तुम्हाला असे म्हणायचे आहे का? असा सवालही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे.
सातारकरांना घरातून बाहेर पडणे आणि वाहन चालवणे मुश्‍किल बनले आहे. असे असताना खासदार मात्र साशा कंपनीच्या तालावर नाचत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना कशाला, ज्या साशा कंपनीमुळे सातारकरांचे जगणे मुश्‍किल झाले आहे, त्या साशा कंपनीलाच पालिका चालवण्यास द्या, म्हणजे तुमचे समाधान होईल असे ही आमदार भोसले म्हणाले.पैसा, टक्‍केवारी आणि कमिनश यातून बाहेर पडला तर, तुम्हाला सातारकरांच्या समस्या दिसतील असे ही आमदार भोसले म्हणाले.

गणरायाच्या विसर्जनाचे विघ्न दूर करण्यासाठी सत्ताधारी आणि खासदारांनी याआधीच हालचाल करायला हवी होती. आता उच्च न्यायालयात जावून प्रश्‍न सुटणार आहे का? गणेशविसर्जनाचा प्रश्‍न सुटला नाही तर, सातारकर जनता तुम्हाला कदापी माफ करणार नाही, याचे भान ठेवा आणि तातडीने हा प्रश्‍न सोडवा असा सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)