स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत नागरिकांनी पुढाकार घ्यावा – विश्‍वासराव देवकाते

पुणे जिल्हा परिषदेत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोहिमेचा शुभारंभ; संदेश देणाऱ्या चित्ररथांचे मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन ; 

1 ते 31 ऑगस्ट दरम्यान देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 31 – जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत असून, या मोहिमेला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेमध्ये आपला जिल्हा “स्वच्छ जिल्हा’ म्हणून नावलौकिक रहावा, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी केले.

भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानांकाच्या आधारे 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोहिमेचा शुभारंभ अध्यक्षांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. तसेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोहिमेचा संदेश देणाऱ्या चित्ररथांचे मान्यवरांच्या हस्ते उद्‌घाटन करून, चित्ररथ जिल्ह्यात विविध ठिकाणी मार्गस्थ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, दीपक चाटे, डॉ. दीलीप माने उपस्थित होते.

आपण केलेल्या स्वच्छतेच्या कामाचे सादरीकरण करण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे सर्व प्रशासनाने या महिन्यात प्राधान्याने स्वच्छ सर्वेक्षण हा विषय घ्यावा असे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, या स्वच्छ सर्वेक्षणात सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून 2 ऑक्‍टोबर 2018 रोजी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील 10 ते 16 ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींची निवड ही केंद्र शासनाकडून केली जाणार असल्याने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सदर सर्वेक्षणासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रार्थना स्थळे, यात्रास्थळे, बाजारतळ अशा विविध सार्वजनिक ठिकाणांची तपासणी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. त्यामध्ये 1405 ग्रामपंचायतींमधून जिल्ह्याचे स्वच्छता गुणांकन या 10 ते 16 ग्रामपंचायतींवर अवलंबून असणार आहे. या स्वच्छता सर्वेक्षणांमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील प्रभावी व्यक्ती ग्रामस्थ यांच्या प्रत्यक्ष व मोबाईलद्वारे प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)