स्वच्छतेच्या चळवळीने नदीकाठी पुन्हा गुंजतेय पक्ष्यांची किलबिल

विठ्ठलवाडीत नदीचा काठ पुनरूज्जीवित करण्याचे प्रयत्न

पुणे – नदी म्हणजे जीवन.. नदी म्हणजे मानवी आस्तित्त्वाच्या पाऊलखुणा…नदी म्हणजे पक्ष्यांचा विहार पाहण्याची सर्वोत्तम जागा. पण, मानवी हव्यास या नदीच्या आणि पर्यायाने पक्ष्यांच्या जीवावर उठला आहे. गलिच्छ नदी पाहिली, की सर्वांनाच वाटतं, की “नदी पुन्हा स्वच्छ व्हावी आणि तिच्या परिसरात स्वच्छंद पक्षी पुन्हा दिसावेत.’ याच नदीवरील प्रेमापोटी काही ध्येयवेड्या लोकांनी एकत्र येऊन विठ्ठलवाडी येथील नदी काठ स्वच्छतेचा विडा उचलला आहे. त्याचा परिणाम म्हणजे नदी परिसरातील हरवलेले पक्षी पुन्हा एकदा नदीकाठी बागडू लागले आहेत.

“जीवित नदी’ या संस्थेतर्फे राबविल्या जाणाऱ्या “नदी किनारा दत्तक’ या उपक्रमांतर्गत विठ्ठलवाडी येथील नदीचा काठ पुनरूज्जीवित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संस्थेच्या सदस्यांतर्फे दर रविवारी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जाते. तसेच, याठिकाणी असलेल्या गोमुखांची स्वच्छता करून शुद्ध पाण्याचा प्रवाह पुनरूज्जीवित करण्यात आला आहे. परिणामी, विठ्ठलवाडी येथील काठावर स्वच्छ पाण्याचा प्रवाह असलेली छोटी तळीदेखील निर्माण झाली आहेत. स्वच्छ पाण्याचा प्रवाह, पाणवनस्पती आणि पाणथळ प्रदेश यामुळे पक्षांनादेखील याठिकाणी खाद्य उपलब्ध होत असल्यामुळे गेल्या अनेक काळांपासून दिसेनासे झालेले पक्षी पुन्हा एकदा या नदीकाठी दिसू लागले आहेत.

याबाबत “जीवितनदी’च्या सदस्या आदिती देवधर म्हणाल्या, “संस्थेच्या सदस्यांकडून केल्या जाणाऱ्या स्वच्छतेमुळे या ठिकाणी पाणथळ प्रदेश निर्माण होत आहे. यामुळे पक्षांना आवश्‍यक खाद्य उपलब्ध होण्यास मोठी मदत मिळत आहे. याठिकाणी टिटवी, मैना यासारखे नेहमी आढळणारे पक्षी तर दिसताहेतच परंतु त्याव्यतिरिक्त लाल मुनिया (रेड मुनिया), सीनॅमिन बीटर्न यासारखे क्वचितच दिसणारे पक्षीदेखील दिसू लागले आहेत. या पक्ष्यांचे येथील अस्तित्व ही आमच्या कामाची पावती आहे. मात्र, हे काम अजूनही संपलेले नाही. यापुढेही हे काम अशाप्रकारे सुरू राहणार असून, शहरातील इतर ठिकाणी देखील अशाचप्रकारे संस्थेचे सदस्य काम करत आहेत.’

विद्यार्थी घेताहेत पक्ष्यांच्या नोंदी
जीवितनदी संस्थेतर्फे दर रविवारी आयोजित स्वच्छता उपक्रमाबरोबरच शालेय मुलांना नदी स्वच्छता आणि पक्षी संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले जाते. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना पक्षीनिरीक्षण कसे करायचे? त्यांच्या नोंदी कशा घ्यायच्या याबाबत माहिती सांगून त्या नोंदी ठेवण्यास सांगितल्या जात आहेत. पाचवी ते सातवी इयत्तेतील सुमारे दहा मुले या उपक्रमात सहभागी असून, विठ्ठलवाडी येथे हा पक्षीनिरीक्षणाचा कार्यक्रम होतो.

शेकाट्याचे आव्हान आणि किंगफिशरची वाट
या नदीकाठी विविध पक्षी दिसणे ही सर्वांसाठीच आनंदाची बाब आहे. मात्र, इतर पक्ष्यांसोबत याठिकाणी शेकाट्या पक्षीही आढळत आहे. हा पक्षी घाण पाण्यातील किड्यांवर जगतो. त्यामुळेच शेकाट्याचा येथील वावर ही चिंतेची बाब आहे. त्यासाठी नदीत मिसळणारे सांडपाणी रोखणे हे आव्हान असणार आहे. तसेच, स्वच्छ नदीतील पाण्यात डुबके मारून चोचीने मासे पकडणारा किंगफिशर पक्षी हा एकेकाळी या परिसराची ओळख होता. तो किंगफिशर पुन्हा दिसेल तेव्हाच हा नदी परिसर स्वच्छ असल्याचे सिद्ध होईल, त्यामुळे नदीसाठी काम करणारे सदस्य मनापासून किंगफिशरची वाट पाहात असून, तो दिसेपर्यंत हे काम चालूच राहणार असल्याचेही आदिती यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.