“स्मार्ट सिटी’त भरतो रस्त्यावरच बाजार

प्रशांत होनमाने

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सुविधेसाठी कोट्यावधी रुपये खर्चून 13 भाजी मंडई बांधल्या आहेत. त्यात 971 गाळे उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे सध्या यातील केवळ 7 मंडई सुरु असून उर्वरीत 6 मंडई या चुकीची जागा, पालिकेच्या भूमी-जिंदगी विभागाची उदासीनता व सोयी-सुविधांअभावी विनावापर पडून आहेत. त्यामुळे “स्मार्ट सिटी’त आजही रस्त्यावर बाजार भरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आशिया खंडात श्रीमंत म्हणून बिरुद मिरवणारी पिंपरी-चिंचवड महापालिका मिळकतींच्या बाबतीतही सधन आहे. विविध कार्यालयांपासून ते नाट्यगृह, उद्यान, क्रीडा संकुल, शैक्षणिक संकुल, भाजीमंडई अशा अनेक मिळकती महापालिकेने उभारल्या आहेत. मात्र, पुढाऱ्यांच्या हट्टाखातर मिळकती उभारायच्या आणि कालांतराने त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या महापालिकेच्या कार्यपध्दतीमुळे आज शेकडो मिळकती असून “अडचण अन्‌ नसून खोळंबा’ ठरत आहेत. अशीच अवस्था महापालिकेने शहरातील विविध भागात उभारलेल्या भाजी मंडईंच्या बाबतीत झाली आहे.

सध्या शहरातील मंडईमधील एकूण 971 पैकी केवळ 583 गाळे सुरु आहेत तर 388 गाळे वापराविना पडून आहे. त्यामुळे भाजी मंडई बांधण्यासाठी पालिकेने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. विशेष म्हणजे यातील अनेक भाजी मंडईंच्या ठिकाणी मोठ्या गैरप्रकार सुरु असल्याचे दैनिक “प्रभात’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. बहुसंख्य भाजी मंडईचा उपयोग पार्किंग, भंगार साहित्य ठेवण्यासाठी होत आहे. या बंद असलेल्या मंडई भिक्षूक, गर्दुले, टवाळखोरांचे अड्डा बनल्या आहेत.

महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे भाजी मंडईच्या मूळ संकल्पनेस हरताळ फासला गेला आहे. तर अनेक भाजी मंडईची जागा व्यवसायासाठी अयोग्य असल्याचे सांगत भाजी विक्रेत्यांनी या गाळ्यांकडे पाठ फिरवली आहे. सर्वच ठिकाणी मूलभूत सोयी-सुविधा अभाव पहायला आहे. त्यामुळे भाजी मंडई सोडून इतर ठिकाणी भाजी विक्रेते व्यवसाय करतात. परिणामी अतिक्रमणांना हातभार लागत आहे. तसेच वाहतुकीला अडथळा होतो, असे मत विठ्ठल गायकवाड या ज्येष्ठ भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड शहरात आकुर्डी येथील खंडेराय भाजी मार्केटमध्ये 105 गाळे, गांधी पेठ, चिंचवड येथील भाजी मंडईत 48 गाळे, डांगे चौक भाजी मंडई 15 गाळे, पिंपरी येथील लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडईत 180 गाळे, पिंपरी भाजी मंडईतील 22 ओटे, तर भोसरी येथील भांजी मंडईतील 173 गाळे असे एकूण 583 चालु आहेत. मात्र या 583 गाळेधारकांपैकी अनेक गाळेधारकांनी गाळ्यांचे भाडे थकवल्याने, तसेच भाजी मंडईपेक्षा रस्त्यावर बसून व्यवसाय चांगला होतो, अशी मानसिकता झाल्याने विक्रेते पुन्हा रस्त्यावरच बसून भाजी विक्री करू लागले आहेत. त्यामुळे या मंडईतील निम्मे गाळे कुलूपबंद आहेत. भोसरीतील धावडे वस्ती भाजी मंडईतील 40 गाळे, पिंपरीगाव, तपोवन- चिखली येथील संत सावता माळी भाजी मंडईतील 139 गाळे, आकुर्डी येथील नाल्यावरील भाजी मंडईतील 51 गाळे, मासुळकर कॉलनीतील 60 गाळे, रामनगर भाजी मंडईतील 34 गाळे, सांगवी येथील भाजी मंडईतील 76 असे एकूण 388 गाळे विनावापर पडून आहेत.

बहुसंख्य भाजी मंडईंमधील गाळ्यांची क्षमता अपुरी आहे. परिणामी विक्रेते रस्त्यावर भाजी विक्री करतात. अशा जुन्या विक्रेत्यांचे महापालिकेने सर्व्हेक्षण करुन त्यांना गाळे उपलब्ध करून द्यायला हवेत. पिंपरी मंडईमध्ये एकूण 180 गाळेधारकांव्यतीरिक्त 450 ते 500 फळ, भाजीपाला व इतर विक्रेते आहेत. हे विक्रेते नाईलाजास्तव रस्त्यावरच बसत आहेत. त्यांना गाळे उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही महापालिकेला हवे ते सहकार्य करायला तयार आहोत. महापालिकेने त्यांना योग्य तो भाडेदर आकारावा. भाजी मंडई परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृह आदी सुविधांचा अभाव आहे. भाजी मंडईच्या सुरक्षिततेकडे महापालिकेने लक्ष पुरवायला हवे.
– विठ्ठल गायकवाड, ज्येष्ठ फळ विक्रेते, पिंपरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)