स्मार्ट सिटीचे “आपत्ती व्यवस्थापन’ केवळ कागदावरच

अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहचण्यासाठी लागले दोन तास : नागरिक संतप्त

पुणे – देशातील पहिला महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्याचा टेंभा मिरविणाऱ्या महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा केवळ कागदावरच असल्याचे धक्कादायक चित्र आज दांडेकर पूल वसाहतीमध्ये घुसलेल्या कालव्याच्या पाण्यामुळे उघड झाले आहे. या घटनेनंतर केवळ महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रमुखांना घटनास्थळी पोहचण्यासाठी तब्बल 2 तास लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात 24 तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत असल्याचा दावा करणाऱ्या पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीच सर्वात उशीरा घटनास्थळी पोहचले, परिणामी महापालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना या उशीराने आलेल्या मदतीबाबतच्या नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात कोणत्याही स्वरूपाची आपत्ती आल्यानंतर तातडीने मदत पोहचविण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत आहे. यासाठी गणेश सोनुने यांची शासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून नियुक्ती देखील केली आहे. यासाठी महापालिकेच स्वतंत्र कक्ष असून, हा 24 तास सुरू असतो. परंतु, तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी सोनुने यांच्याकडे वारजे-कर्वेनगर क्षेत्रिय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला. क्षेत्रिय कार्यालयाचा कामाच्या प्रचंड व्यापात सोनुने यांचे आपत्ती कक्षाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. यामुळे आठवड्यातील बहुतेक दिवस सोनुने क्षेत्रिय कार्यालयाच्याच कामात अधिक व्यस्त असतात.

शासनाच्या आदेशानुसार पावसाळ्यात किमान 15 ऑक्‍टोबरपर्यंत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सर्तक असले पाहिजे. परंतु, पाऊस बंद झाल्याने महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील थंड झाला असल्याचे आज दिसून आल्यामुळे गुरूवारी सकाळी सव्वा आकरा वाजता शहरात प्रचंड मोठी आपत्ती निर्माण झाल्यानंतरदेखील महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्याचे गांभीर्य कळले नाही. घटना सव्वा आकरा वाजता घडली असतान आपत्ती व्यवस्थान अधिकारी गणेश सोनुने अनेकांचे फोन येऊ लागल्याने साडे बारा वाजता राजारामपुलाच्या वाहतुक कोंडीतून वाट काढत तब्बल 2 तासांनंतर म्हणजे सव्वा एक वाजता घटनास्थळी पोहचले.

शहरात पूर हीच प्रमुख आपत्ती!
दरवर्षी शहरात प्रामुख्याने नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शहरात पाणी घुसते, त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पावसाळ्यातील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम केले जाते. त्यासाठी सर्व क्षेत्रिय कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र, यावेळी नदीतून पाणी न येता कालव्यातून पाणी आले. मात्र, हासुध्दा पूरस्थितीचा प्रकार असताना, केवळ अग्नीशमनदलच या ठिकाणी मदतीसाठी दिसून आले. ना क्षेत्रिय अधिकारी आले ना, आपत्ती व्यवस्थापन कक्षातील त्यांचे कर्मचारी, त्यामुळे एक प्रकारे महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्ष केवळ केंद्र व राज्यशासनाची दिशाभूल करण्यासाठी नेमला आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)