स्मार्ट सिटीची वेस बदलणार

हद्दवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीत दाखल : वर्षभरानंतर मुहूर्त

पुणे : स्मार्ट सिटी योजनेतील प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने क्षेत्र विकास (एरिया डेव्हप्लमेंट) साठी निवड केलेल्या क्षेत्राची हद्द दीडपट वाढविण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. मागील वर्षी ऑगस्ट 2017 मध्ये स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव पालिका प्रशासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव अखेर येत्या 3 ऑक्‍टोबरला होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत ठेवला आहे. त्यामुळे स्थायी समिती आणि मुख्यसभेची मान्यतेनंतर या हद्दवाढीचा मार्ग मोकळा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्मार्ट सिटी स्पर्धेत 2015 मध्ये पुणे पालिकेने देशात द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यावेळी महापालिकेने एरिया डेव्हल्पमेंटसाठी बाणेर-बालेवाडीची निवड केली. त्यावेळी अवघा 3.50 चौरस किलोमीटर भाग निवडण्यात आला. “स्मार्ट सिटी’च्या 2 हजार 949 कोटी रुपयांमधील तब्बल 2 हजार 196 कोटी रुपये या भागासाठी खर्च केले जाणार आहेत. त्यात 34 प्रकल्प राबविले जाणार आहेत. याशिवाय, पहिले काही प्रकल्प करणे शक्‍य नसल्याने या भागासाठी काही नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र, त्यासाठी आवश्‍यक जागाच या भागात नाहीत. तसेच, नागरिकरण वाढल्याने प्रकल्पांसाठी ताब्यात घेण्यासही जागा नाहीत. त्यामुळे या योजनेचे काम सुरू झाले असले, तरी ते दिसून येत नाही. अनेक प्रकल्प जागेअभावी ठप्प आहेत. त्यामुळे सुरुवातीला निवड केलेल्या भागाची हद्दवाढीची मागणी या भागातील भाजप नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर “स्मार्ट सिटी’ कंपनीने हा प्रस्ताव संचालक मंडळासमोर ठेवला. संचालक मंडळाने त्यास मान्यता दिली असली, तरी हद्दीवाढीच्या प्रस्तावास महापालिका मुख्यसभेची मान्यता आवश्‍यक आहे. ती नसल्याने अनेक प्रकल्पांचे काम थांबले आहे. याबाबत महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानुसार, हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

विविध सुधारणांसाठी हद्दवाढ आवश्‍यक
यापूर्वी संचालक मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार, सध्याची “स्मार्ट सिटी’ची हद्द दीडपट वाढणार आहे. त्यात बाणेर, बालेवाडी, तसेच औंध-बाणेर भागांची वाढ होणार आहे. यात बाणेर-3.80, बालेवाडी- 2.66, तर औंध-बाणेर 3 चौ.कि.मी. वाढणार आहे. या वाढीव हद्दीत रस्ते सुधारणा, शाळा, हॉस्पिटल, उद्याने, तसेच इतर नागरी सुविधा दिल्या जाणार आहेत. या भागासाठीची स्वतंत्र सार्वजनिक वाहतूक महापालिकेच्या व्यवस्थेशी संलग्न करण्यासाठी पहिली हद्द अपुरी असल्याने ही वाढ आवश्‍यक असल्याचे कंपनीच्या प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे सुरुवातीला या नवीन हद्दीचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

अभिप्रायाची वाट पाहू नका
“स्मार्ट सिटी’च्या प्रस्तावाबरोबरच औंध भागातील भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर, प्रकाश ढोरे आणि विजय शेवाळे यांनीही या हद्दवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीत दिला होता. त्यानुसार, या प्रस्तावावर संबंधित सर्व विभागांचे अभिप्राय घेण्याच्या सूचना तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी दिल्या होत्या. मात्र, केवळ पथ विभागाचाच अभिप्राय आल्याने प्रशासनाने हे दोन्ही प्रस्ताव स्थायी समितीत दिले नव्हते. त्यातच पालिकेकडून निर्णय घेण्यास उशीर होत असल्याने “स्मार्ट सिटी’कडून पालिकेस वारंवार हद्दवाढीवर निर्णय घेण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या प्रकल्पांच्या आढावा बैठकीत अभिप्रायांची वाट न पाहाता पथ विभागाचा अभिप्राय आणि “स्मार्ट सिटी’ने पाठविलेला प्रस्ताव स्थायी समिती व मुख्यसभेत सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)