“स्मार्ट सिटी’चा अखेर विस्तार

सुनील राऊत

दीडपट वाढणार हद्द : तब्बल वर्षभरानंतर प्रस्ताव मुख्यसभेत येणार

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – “स्मार्ट सिटी’ योजनेतील प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने क्षेत्र विकास (एरिया डेव्हप्लमेंट) साठी निवड केलेल्या क्षेत्राची हद्द दीडपट वाढविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ऑगस्ट 2017 मध्ये “स्मार्ट सिटी’च्या संचालक मंडळाने मान्यता दिलेला हा प्रस्ताव तब्बल वर्षभरानंतर ऑगस्टच्या महापालिका मुख्यसभेत ठेवला जाणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

“स्मार्ट सिटी’ स्पर्धेत 2015मध्ये पुणे पालिकेने देशात द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यावेळी महापालिकेने एरिया डेव्हल्पमेंटसाठी बाणेर-बालेवाडीची निवड केली. त्यावेळी अवघा 3.50 चौरस किलोमीटर भाग निवडण्यात आला. “स्मार्ट सिटी’च्या 2 हजार 949 कोटी रुपयांमधील तब्बल 2 हजार 196 कोटी रुपये या भागासाठी खर्च केले जाणार आहेत. त्यात 34 प्रकल्प राबविले जाणार आहेत. याशिवाय, पहिले काही प्रकल्प करणे शक्‍य नसल्याने या भागासाठी काही नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र, त्यासाठी आवश्‍यक जागाच या भागात नाहीत. तसेच नागरिकरण वाढल्याने प्रकल्पांसाठी ताब्यात घेण्यासही जागा नाहीत. त्यामुळे या योजनेचे काम सुरू झाले असले, तरी ते दिसून येत नाही. अनेक प्रकल्प जागेअभावी ठप्प आहेत. त्यामुळे सुरूवातीला निवड केलेल्या भागाची हद्दवाढीची मागणी या भागातील भाजप नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर “स्मार्ट सिटी’ कंपनीने हा प्रस्ताव संचालक मंडळासमोर ठेवला. संचालक मंडळाने त्यास मान्यता दिली असली, तरी हद्दीवाढीच्या प्रस्तावास महापालिका मुख्यसभेची मान्यता आवश्‍यक आहे. ती नसल्याने अनेक प्रकल्पांचे काम थांबले आहे. याबाबत महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यानुसार, कोणत्याही स्थितीत हा प्रस्ताव ऑगस्टच्या मुख्यसभेसमोर ठेवला जाणार असल्याचे राव यांनी म्हटले आहे.

विविध सुधारणांसाठी हद्दवाढ आवश्‍यक
यापूर्वी संचालक मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार, सध्याची “स्मार्ट सिटी’ची हद्द दीडपट वाढणार आहे. त्यात बाणेर, बालेवाडी, तसेच औंध-बाणेर भागाची वाढ होणार आहे. यात बाणेर-3.80, बालेवाडी- 2.66, तर औंध-बाणेर 3 चौ.कि.मी. वाढणार आहे. या वाढीव हद्दीत रस्ते सुधारणा, शाळा, हॉस्पिटल, उद्याने, तसेच इतर नागरी सुविधा दिल्या जाणार आहेत. या भागासाठीची स्वतंत्र सार्वजनिक वाहतूक महापालिकेच्या व्यवस्थेशी संलग्न करण्यासाठी पहिली हद्द अपुरी असल्याने ही वाढ आवश्‍यक असल्याचे कंपनीच्या प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे सुरूवातीला या नवीन हद्दीचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

“बीओटी’, “पीपीपी’ तत्वावर निधी उभारणे शक्‍य
“स्मार्ट सिटी’ची हद्दवाढ झाल्यास यासाठीचा खर्चही 300 कोटींनी वाढणार आहे. त्याचा आराखडाही कंपनीने संचालक मंडळासमोर ठेवला असून प्रामुख्याने नवीन प्रकल्पांसाठी तसेच हद्दीवाढीतील जागा ताब्यात घेण्यासाठी या खर्चाची आवश्‍यकता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच प्रकल्पांसाठी “बीओटी’ आणि “पीपीपी’ तत्वावर निधी उभारणे शक्‍य असल्याचेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

“स्मार्ट सिटी’च्या प्रलंबित प्रकल्पांबाबत नुकतीच बैठक झाली आहे. यात कंपनीकडून हद्दवाढीची मागणी करण्यात आली. त्यानुसार, हा प्रस्ताव ऑगस्टच्या मुख्यसभेत ठेवला जाईल.
– सौरभ राव, आयुक्त, महापालिका.

हद्दवाढीचा मुख्यसभेत मान्य होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे योजनेच्या अनेक प्रकल्पांसाठी आणि सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी आवश्‍यक जागा उपलब्ध होईल. त्यामुळे योजनेच्या कामातही मोठ्या प्रमाणात गती येण्यास मदत होईल.
– डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, “स्मार्ट सिटी’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)