“स्मार्ट’ शहराला बेशिस्तांचे ग्रहण

काही महाभागांनी पेटविल्या स्मार्ट सायकल : उद्देशाला हरताळ, प्रशासनाचे दुर्लक्ष्य

विद्यापीठ परिसरातही योजनेला घरघर


नागरिकांमध्ये जागरुकता नाही

पुणे – स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात उपलब्ध करून देण्यात आलेल्या सायकल योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सायकलींची मोडतोड, घरात नेवून लावणे अशा प्रकारचे सर्रास प्रकार होत असताना आता कोथरुड परिसरातील काही महाभागांनी चक्क सायकल जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नागरिक जागरूक कधी होणार? असा सवाल उपस्थित होत असून प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष्य होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट सायकल शेअरींग योजना सुरू केली आहे. सुरवातीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात या सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यानंतर योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहून शहरभर सायकलींचे जाळे पसरविण्यात आले. कोथरुड, हडपसर, औंध, शिवाजीनगर, येरवडा आदी परिसरात सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, काही महाभागांकडून या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम सुरू आहे.

कोथरुड परिसरातील कर्वेरस्त्यावरील डहाणूकर चौक ओलांडल्यानंतर असणाऱ्या परांजपे बिझनेस हब शेजारी कचऱ्यात सायकल जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी तब्बल 5 सायकल जाळण्यात आल्या. हा प्रकार निदर्शनास आल्याबरोबर नागरिकांनी अग्निशमन विभागाला फोन करून माहिती दिली. मात्र, अग्निशमन विभागाची गाडी येऊन आग विझवेपर्यंत त्या पूर्णपणे जळाल्या होत्या. यामुळे मोठे नुकसान झाले असून काही बेशिस्त महाभागांमुळे स्मार्ट सायकल योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. दरम्यान, या परिसरात अनेक सायकल बेवारस पडून असल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे जीपीएस सिस्टीम असलेल्या या सायकल प्रशासनाने शोधून त्या व्यवस्थित ठिकाणी लावण्याचे काम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यामुळे सायकल सर्वांना वापरण्यास मिळून चांगल्या योजनेचा बोजवारा उडणार नाही.

विद्यापीठ परिसरातील सारखीच परिस्थिती
शहरात सर्वप्रथम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात स्मार्ट सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. झूमकार आणि ओफो या कंपनीच्या सहकार्यातून तब्बल 275 सायकल उपलब्ध झाल्या होत्या. मात्र, विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्ष्यामुळे बऱ्याच सायकल गायब झाल्या. तसेच परिसरातील काही कर्मचारी आपल्या घरामध्ये सायकल नेवून लावत असल्याचे समोर आले होते. त्याचबरोबर विद्यापीठामागे असलेल्या वस्तीत ओफो कंपनीची सायकल जाळण्यात आली होती. या सर्व प्रकारामुळे विद्यापीठ परिसरातून सुरवात झालेल्या या योजनेला विद्यापीठातच स्थान राहीलेले नाही. यामुळे आजघडीला विद्यापीठ परिसरात केवळ 10 ते 15 सायकल वापरण्यास उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)