स्मशानभूमीचे तीन वर्षापासून बांधकाम रखडले

स्मशान अवकळा – भाग 1

पिंपरी – पिंपरीनगर येथील काळेवाडी पुलाजवळ अडीच एकरच्या परिसरामध्ये असलेल्या त्रैलोक्‍य स्मशाभूमीमध्ये सोयी सुविधांची वाणवा असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. त्यातच चारही बाजूंनी असलेल्या घाणीच्या साम्राज्याने अंत्यविधीला येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे मागील तीन वर्षांपासून स्मशानभूमीच्या शेडचे काम रखडले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मागील तीन वर्षापासून बांधकाम अर्धवट परिस्थितीत पडून आहे. त्यामध्ये तीन दहन शेडचे बांधकाम होते. या पैकी एका शेडवरच स्लॅप टाकला असून तोही अर्धवटच आहे. दुसऱ्या शेडसाठीच्या खांबांचे काम झाले आहे. त्यामुळे जुन्या असलेल्या शेडमध्येच अंत्यविधी पार पडत आहे. परंतु, ही शेड अत्यंत जुनाट असून जीर्ण अवस्थेत आहे. पत्रा खराब झाला असून काही ठिकाणी तो निखळण्याच्या मार्गावर आहे. त्यातच खांबांची देखील दूरवस्था झाली असून वेळीच त्याचे काम झाले नाहीतर ते कोसळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

जुन्या शेडमधील दहन खड्ड्यांची दोन महिन्यापूर्वीच डागडूजी करण्यात आली. तरी देखील खड्ड्याच्या विटा निघल्या आहेत. त्या विटांना उचलण्याची दखल कोणी घेतली नसून त्याच ठिकाणी पडलेल्या आहेत. तसेच बांधकाम सुरू झाले तेव्हापासून बांधकामासाठी लागणारे साहित्य देखील शेडमध्येच पडून आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. प्रशासनाने या साहित्याची विल्हेवाट लावण्याची मागणी जोर धरत आहे. येथेच असलेल्या जुन्या दफनभूमीमध्ये देखील स्वच्छतेचा अभाव दिसून आला. त्या ठिकाणी जागोजागी दारूच्या बाटल्या आणि ग्लासही आढळले. पिण्याचे पाणी असलेल्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून आला. नळाच्या तोट्या देखील चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले.

अंत्यविधीला आलेल्या नागरिकांच्या निवाऱ्यासाठी असलेल्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. त्याचबरोबर त्या शेडमध्ये केलेला कोबा निघून गेला असून माती आणि कचराच तिथे दिसून आला. स्वच्छतागृहाची देखील वेळेवर साफसफाई होत नसल्याचे आढळून आले. पाण्याच्या टाकीची शेवटची सफाई कधी झाली असेल हे कळायला देखील मार्ग नव्हता. आजूबाजूला राहणाऱ्यांनी स्मशानभूमीला प्रातःविधीचे ठिकाण बनवले आहे.

स्मशानभूमीच्या सुरक्षा भिंतीला लागूनच नाला गेला आहे. त्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून पावसाळा तोंडावर येवूनही त्याची स्वच्छता झालेली नाही. नाल्यातील कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे याठिकाणी उभे राहणे असहय्य झाले आहे. पुलाजवळ त्रैलोक्‍य स्मशामभूमीचे फलक लावलेले आहे. परंतु स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारावर कुठल्याच प्रकारचे फलक नसल्याने नागरिकांना स्मशानभूमी शोधण्यास अडचण येत आहे.

नागरिकांच्या मागण्या
– स्मशानभूमीचे बांधकाम पूर्ण व्हावे
– वेळेवर स्वच्छता केली जावी
– दहन खड्डयांचे काम करण्यात यावे
– नामफलक बसविण्यात यावे
– नाल्यातील कचरा साफ करावा
– स्वच्छतागृहांची वेळोवेळी स्वच्छता करावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)