#स्मरण: हा जिव्हाळा कोठे हरवला आहे?   

योगिता जगदाळे 
व्हाटसऍपवर दररोज अनेक पोस्ट येत असतात. नाही म्हटले तरी माझे 60-70 कॉंटॅक्‍टस आहेत. आणि दोनतीन ग्रुप्स. एक कुटुंबीयांचा, एक क्‍लासमेट्‌सचा आणि एक असाच आहे-हसत खेळत जीवन नावाचा. दिवसातून एकच वेळा मी व्हाट्‌सऍप बघते. रात्री जेवण झाल्यानंतर भरल्यापोटी शांतपणे. मोजून अर्धा तास देते. अगदी अलार्म लावून. मी हल्लीच ही सवय लावून घेतली आहे. नाही तर दिवसातला बराच वेऴ जायचा त्यात. जरा र्टुर्र झाले, की मोबाईल काढून बघायची.
आलेल्या पोस्टपैकी काही पोस्ट मी मनापासून वाचते, काहीवर केवळ नजर टाकते आणि बऱ्याचशा डीलिट करून टाकते, अनेकदा तर एकच पोस्ट चारसहा वेळा वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेली असते. त्यात वेळ घालवण्यात अर्थ नसतो. काही पोस्ट मात्र मनाला भिडणाऱ्या असतात. वाचनीय असतात. अशा पोस्ट मी सेव्ह करून ठेवते. काही मोजक्‍या फॉरवर्ड करते. काल एक व्हिडियो आला होता. एका लहान मुलाचा. तसे लहान मुलांचे बरेच व्हिडियो, फोटो येत असतात. पण त्यात काही विशेष असतेच असे नाही. मात्र हा व्हिडियो मला फारच आवडला. केरळमधील पुरासंबंधी होता तो. केरळच्या पुराबद्दल शेकड्यानी व्हिडियो व्हायरल झाले आहेत.
पाण्याचे, घरांचे ,गाड्यांचे, आणि माणसांचे. . . . त्या पुरात सापडलेल्या आणि त्यांच्या मदतीला जाणाऱ्या माणसांचेही. अशा प्रसंगात माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या असंख्य घटना दिसतात. मदत करणऱ्या लष्करच्या जवानांना पाहून अतीव अभिमान वाटतो. पण मला आवडलेली पोस्ट एका लहान मुलाची होती. एका घरात टीव्हीवर पुराची दृष्ये पाहणारे कुटुंब होते त्यात. एक लहान-पाच सहा वर्षांचा मुलगा, अगदी गोंडस दिसणारा, पाहिल्यानंतरच अतिशय लाडात वाढलेला आहे हे जाणवणारा, पुराच्या दृष्यांचे घरातील सर्वच मंडळीवर परिणाम होतातच, काही प्रतिक्रिया व्यक्त होतात, त्यातूनच मदतीचे हात पुढे येतात. ते दृष्य होते- एका घराच्या छपरावर उभी असलेली, चिंब भिजलेली माणसे. मदतीची वाट बघत असलेली.
त्यांची अवस्था पाहून त्या लहान मुलाचा चेहरा एकदम बदलतो, रडवेला होतो आणि काही क्षणातच तो हमसून हुमसून रडू लागतो. त्याचे वडील त्याला जवळ घेतात. विचारतात “काय झाले?’ ” त्यांची घरे बुडाली.’ मुलगा उत्तर देतो, “ते आता कुठे राहंणार?’ “त्यांची काहीतरी सोय केली पाहिजे.’ वडील सांगतात. ” ते मदतीची वाट बघत आहेत.’ ” त्यांना आपल्या घरी बोलवू या. . . . . ‘ मुलगा हुंदके देतच म्हणतो. वडील म्हणतात, “होय बोलवूया,’ “त्यांना सांगा आमच्या घरी या. येथे राहा. आमचे घर मोठे आहे.’ मुलगा सांगतो. त्याच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत करुणा पसरली आहे. “होय बाळा, आपण त्यांना सांगू, आमच्या घरी येऊन राहा. मग तुमचे घर तयार झाले की परत तुमच्या घरी जा.’ वडील समजावतात. मुलाचा चेहरा थोडासा अगदी थोडासाच खुलतो.
मात्र डोळ्यातून अश्रू ओघळतच असतात, वडील त्याचे डोळे पुसून त्याला आणखी जवळ घेतात. त्याखाली पाठवणाराने लिहिले होते- ” हा जिव्हाळा आजकाल कोठे हरवला आहे?’ किती खरे आहे. आजकाल परक्‍यांबद्दल सोडाच, अगदी जवळच्यांबद्दलही जिव्हाळा नावाची गोष्ट राहिलेली नाही. केवळ उघडानागडा व्यवहार. मी, माझे, मला.. संपले. कुठे गेले ते दिवस, जेव्हा सर्वत्र कमालीचा आपलेपणा होता. दलाई लामा यांनी म्हटले आहे ना, – घरे मोठी झाली, पण मने लहान झाली. तसाच प्रकार होऊ लागला आहे. या मुलाचे कौतुक वाटते, कारण आजकाल लहान मुलांनाही अशीच शिकवण दिली जाते की कोणाला काही द्यायचे नाही. कोणाशी बोलायचे नाही. पती-पत्नीतही साताजन्माचे सोबती ही भावना राहिलेली दिसत नाही. माझे तुझ्यावाचून काही अडत नाही ही भावना प्रबळ होताना दिसते. हे पाहून ते वाक्‍य पुन्हा पुन्हा आठवते- हा जिव्हाळा आजकाल कोठे हरवला आहे?
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)