#स्मरण: ‘शहीद भगतसिंग’ विवेकवादी विचारवंत क्रांतिकारक 

प्रसाद कुलकर्णी 
शहीद भगतसिंग 28 सप्टेंबर 1907 रोजी जन्मले आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी 23 मार्च 1931 रोजी फाशी गेले. गेली नऊ दशके भारतासह जगभरच्या तरुणांचे “आयडॉल’ म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या 111 व्या जयंतिनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर दृष्टीक्षेप… 
सर्वांगीण शोषणाविरुद्ध लढणारा एक लढवय्या विवेकवादी, मार्क्‍सवादी तरुण विचारवंत असलेले भगतसिंग हे नव्या समतावादी समाजाचे स्वप्न पाहत होते. देशभक्तीने आणि स्वातंत्र्यचळवळीच्या आंदोलनाने प्रेरीत झालेल्या, त्यात सक्रीय सहभागी असलेल्या शेतकरी कुटुंबात ते जन्मले. विद्यावती व किशनसिंग हे त्यांचे माता-पिता. वडील किशनसिंग लाला लजपतराय यांचेबरोबर तुरुंगवास भोगलेले तर त्यांचे काका अर्जुनसिंह हे मोठे नेते होते.
सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बंग या त्यांच्या जन्मगावी झाले. महाविद्यालयीन शिक्षण लाहोरला झाले. लाहोरच्या डीएव्ही कॉलेजात त्यांनी विद्यार्थी संघटना बांधली आणि आजन्म अविवाहीत राहून देशसेवेचे व्रत घेतले. प्रारंभी कॉंग्रेसमध्ये काही काळ राहिल्यानंतर ते त्यातून बाहेर पडले. त्यांच्यावर “गदर’ची (क्रांती) क्रांतीकारी चळवळ आणि कार्ल मार्क्‍स व लेनिन यांचे तत्त्वज्ञान यांचा मोठा प्रभाव होता. “गदर’ पक्षाने त्याकाळी अमेरिका व कॅनडातही भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे विचार रुजविले. त्यांच्या जाहीरनाम्यात समाविष्ट तत्त्वे अशी होती…
1) भारत हे स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असेल
2) ते धर्म निरपेक्ष असेल आणि
3) श्रमिकांतील आंतरराष्ट्रीय बंधुभाव जोपासला गेला पाहिजे
वयाच्या सोळाव्या वर्षी भगतसिंग “हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’मध्ये सहभागी झाले. यातील “समाजवाद’ याबद्दल भगतसिंग व सुखदेव कमालीचे आग्रही होते. याच काळात सन 1917 ची रशियन राज्यक्रांती, सन 1922 चे असहकार आंदोलन मागे घेणे आणि सन 1925 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना या घटनांचा मोठा परिणाम भगतसिंगांच्या विचारांवर झाला. त्यांनी चंद्रशेखर आझाद, सुखदेव बटुकेश्‍वर दत्त, भगवतीचरण वर्मा, जतींद्रदास आदींच्या सहाय्याने “नौजवान भारत सभा’ काढली. त्याद्वारे क्रांती कार्याला सुरुवात केली. माणसां-माणसांतील शोषण दूर करणे आणि किसान व कामगारांचे राज्य आणणे हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट होते. तसेच या सभेच्या जाहीरनाम्यात राजकीय तत्त्वज्ञान मांडताना स्पष्टपणे म्हटले होते की, इंग्रज आमच्या संपत्तीचा व स्वाभिमानाचा नाश करीत असून त्या राजवटीचे क्रांतीच्या मार्गाने उच्चाटन करणे आवश्‍यक असून जनतेसाठी जनतेकडून क्रांती घडवून आणणे गरजेचे आहे.
खटल्यातील बंदींची तुरुंगातून सुटका करणे, “सायमन कमिशन’ला विरोध करणे, शस्त्रे जमा करणे, महत्त्वाच्या केंद्रात बॉम्ब तयार करणे ही कामे नौजवान सभेद्वारे सुरू होती. सन 1926 मध्ये दसऱ्याला लाहोरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात भगतसिंगना पकडले. परंतु, पुराव्याअभावी त्यांना सोडून दिले. लाला लजपतराय यांच्यावर हल्ला करणाऱ्या स्कॉटला धडा शिकवायचा म्हणून केलेल्या गोळीबारात सॅंडर्स हा अधिकारी मारला गेला. त्यावेळी भगतसिंग फरारी होऊन कलकत्ता, आग्रा, लाहोर, दिल्ली असे फिरत राहिले.
8 एप्रिल 1929 रोजी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत “इंडेडिस्फूट बील आणि पब्लिक सेप्टी बील’ मांडले होते. त्याचा निषेध म्हणून प्रेक्षक सज्जातून भगतसिंग व बटूकेश्‍वर दत्त यांनी बॉम्ब फेकले आणि “इन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणा देत पत्रके फेकली. हा बॉम्ब हिंसा करणारा नव्हता तर मोठा आवाज करणारा होता. त्या पत्रकात लिहिले होते, “बहिऱ्या झालेल्यांसाठी हा मोठा आवाज मानवाकडून मानवाचे शोषण नको, खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान देऊ.’ या प्रकरणात भगतसिंग पकडले गेले. दिनांक 12 जून 1930 रोजी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पण पुढे खास न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आणि 23 मार्च 1931 या दिवशी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू हे देशासाठी शहीद झाले.
तत्त्वनिष्ठा आणि साम्राज्यवाद विरोधी कठोर भूमिका भगतसिंग घेत होते. शेवटी फासावर जातानाही ते लेनिन यांचेच पुस्तक वाचत होते. “एक क्रांतीकारक दुसऱ्या क्रांतीकारकाला भेटतोय,’ हे त्यांचे वाक्‍य होते. देशासाठी हसत हसत फासावर जाणारा हा वीर “माझ्या सुटकेसाठी ब्रिटिशांची याचना करू नका. माझ्या मृत्यूनंतर डोळ्यात अश्रूही आणू नका कारण मी माझे कर्तव्य करतो आहे,’ असे म्हणत होता. कमालीचे बुद्धीप्रामाण्यवादी असलेले शहीद भगतसिंग म्हणजे एक अंतर्बाह्य सर्वार्थाने महामानव होते.
मार्क्‍सच्या वैज्ञानिक समाजवादाशी आणि लेनिनच्या कृतीकार्याशी बांधिलकी मानणाऱ्या भगतसिंगांच्या देव, धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा, स्पृश्‍यास्पृश्‍य, वैज्ञानिकता याबाबतच्या संकल्पना स्पष्ट होत्या. त्या त्यांनी “मी नास्तिक का आहे?’ या पुस्तिकेत स्पष्ट केल्या आहेत. प्रत्येक तरुणाने वाचलेच पाहिजे असे हे महान असे पुस्तक आहे. “देव’ या संकल्पनेबद्दल भगतसिंग लिहितात, “देवाचा उगम कसा झाला याबद्दल माझी कल्पना अशी आहे, की माणसाच्या मर्यादा, दुबळेपणा, त्रुटी यांची झालेली जाणीव विचारात घेऊन, सर्व परिस्थितींना धैर्याने तोंड देण्यासाठी, सर्व प्रकारच्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी, भरभराटीच्या आणि समृद्धीच्या काळात माणसाला आवर घालून त्याच्या वागण्यावर ताबा ठेवण्यासाठी देवाचे काल्पनिक अस्तित्व निर्माण करण्यात आले.’
अंधश्रद्धा मेंदू शिथिल करतात आणि माणसाला प्रतिगामी बनवतात. म्हणून जो मनुष्य स्वतःला वास्तववादी म्हणवतो त्याने संपूर्ण सनातन धर्मश्रद्धेला आव्हान दिले पाहिजे. जर विवेकबुद्धीच्या प्रखर हल्ल्यात ती अंधश्रद्धा तोंड देऊ शकली नाही तर ती कोसळून पडेल,’ हे स्पष्ट करून भगतसिंग म्हणतात, “जर ही पृथ्वी किंवा विश्‍व त्या सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तीमान विधात्याने निर्माण केले असेल तर त्याने मुळात हे सर्व का निर्माण केले? दैन्य आणि यातनांनी भरलेले हे जग, लाखो शोकांतिकांची ही सतत बदलती पण चिरंतन गुंफण, ज्यात एकही प्राणिमात्र सर्वार्थाने समाधानी नाही, हे सर्व त्याने का निर्माण केले? कृपा करून हाच त्याचा कायदा आहे असे म्हणू नका. जर तो नियमांनी व कायद्यांनी बांधलेला असेल, तर तो सर्व शक्तीमान नाही.’
“माणसाने विवेकनिष्ठ जगणे सोपे नाही. अंधाविश्‍वासापासून समाधान किंवा आधार मिळवणे सोपे आहे. परंतु, निरंतन विवेकनिष्ठ आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे’, असे भगतसिंगांचे मत आहे. शास्त्रांची प्रगती होत असताना, शोषित घटक स्वतःच्या मुक्तीसाठी स्वतः संघटीत संघर्ष करत असताना परमेश्‍वररूपी काल्पनिक पात्राची आवश्‍यकता भगतसिंगांना वाटत नाही. आत्ममुक्तीच्या लढ्यात धर्माच्या संकुचित कल्पनेविरुद्ध आणि देवावरच्या विश्‍वासाविरुद्ध लढणे आवश्‍यक असल्याचे सांगून भगतसिंग म्हणतात, “जो माणूस प्रगतीच्या बाजूचा आहे त्याने जुन्या श्रद्धेच्या प्रत्येक बाबीबद्दल टीका करायला हवी. अविश्‍वास दाखवायला हवा. तिला आव्हान द्यायला हवे. प्रचलित श्रद्धेच्या कानाकोपऱ्याचेसुद्धा एकएक करून विश्‍लेषण करायला हवे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)